पणजी : इफ्फीचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने आयोजनात कोणतीही कसूर राहू नये यासाठी सुकाणू समितीची बैठक आज गोव्यात पार पडली. यंदाच्या इफ्फीत रशिया भागीदार होण्याची शक्यता असून ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली हे गोव्यातील इफ्फीला विशेष उपस्थिती लावणार आहेत.
बैठकीनंतर केंद्रीय माहिती तथा प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, 'यंदा २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर असे नऊ दिवस इफ्फी चालणार आहे. इफ्फीचे यंदाचे ५० वे वर्ष असल्याने विशेष उपक्रमांचे आयोजन आहे. सुकाणू समितीवर बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक करण जोहर, सिद्धार्थ राय-कपूर, फिरोज अब्बास खान, सुभाष घई आदी मान्यवरांनी सहभाग घेण्याचे निश्चित केले आहे. याशिवाय आणखी दोन- तीन नावे समाविष्ट केली जातील.
जावडेकर म्हणाले की, येत्या चार महिन्यात आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण करून यंदाचा इफ्फी यशस्वी केला जाईल. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची यावर्षी १५० वी जयंती, त्यामुळे महात्मा गांधी यांच्यावरही विशेष प्रदर्शन असेल. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील फिल्म क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. पुरस्कारांबद्दल बोलताना ते म्हणाले की 'सुवर्ण मयूर साठी ४० लाख, रौप्य मयूर साठी १० लाख तसेच उत्कृष्ट निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री आदींसाठी प्रत्येकी दहा लाख असे पुरस्कार असतील.
यशस्वी करण्यासाठी देशातील सात बड्या शहरांमध्ये 'रोड शो' केले जातील. चित्रपट क्षेत्राशी संबंधितांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. याशिवाय बिझनेस प्रदर्शनही असेल, जे फिल्म क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञानाची माहिती देईल. यंदाच्या इफ्फीचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी तसेच सिने क्षेत्राशी संबंधित शैक्षणिक संस्थांचे विद्यार्थी यांना सहभागी करून घेतले जाईल. काही चांगले चित्रपट इच्छा असूनही लोकांना पाहता येत नाहीत त्यामुळे यंदा खाजगी थिएटरमधूनही चित्रपट प्रदर्शित केले जातील, असेही जावडेकर म्हणाले.
दरम्यान, पत्रकार परिषदेला गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष माजी आमदार सुभाष फळदेसाई, सुकाणू समिती वरील मधुर भांडारकर, केंद्रीय माहिती प्रसारण खात्याचे अधिकारी, चित्रपट महोत्सव संचालनालयाचे अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
पर्रीकर यांना इफ्फीत आदरांजली दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना इफ्फीत आदरांजली वाहिली जाईल. त्यासाठी विशेष कार्यक्रम असेल असे एका प्रश्नावर बोलताना जावडेकर यांनी स्पष्ट केले. जावडेकर यांच्या हस्ते यावेळी इफ्फीच्या पोस्टरचे अनावरण झाले. ते म्हणाले की, गोवा हे आता इफ्फीसाठी कायम स्थळ बनले आहे त्यामुळे पायाभूत सुविधा तसेच अन्य गोष्टीवर भर दिला जात आहे. या प्रत्येक गोष्टीचा आढावा मी घेईन आणि आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील. गेल्यावर्षी ६८ राष्ट्रांनी सहभाग घेतला होता या वर्षी ही संख्या वाढणार असल्याचे जावडेकर यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की ' सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व विभागातील चित्रपट निश्चित होतील. वर्ल्डकपप्रमाणे चार महिने आधी सगळी व्यवस्था असावी आणि त्यानुसार चित्रपटांची तिकिटे ही लोकांना आरक्षित करता यावी यासाठी आम्ही पावले उचलणार असून पुढील वर्षापासून ही व्यवस्था करू,'.
यंदाचा इफ्फी संस्मरणीय : मुख्यमंत्रीमुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, पायाभूत सुविधा आणि इफ्फीत सहभागी होणारे मान्यवर तसेच प्रतिनिधींच्या आदरातिथ्यात कोणतीच कसूर ठेवली जाणार नाही. यंदाचा सुवर्ण महोत्सवी इफ्फी संस्मरणीय ठरेल याची काळजी सरकार घेईल लोकांना इफ्फीतील चित्रपट पाहता येत नाहीत. त्यांच्यासाठी खाजगी थिएटरमध्ये चित्रपट दाखवण्याची व्यवस्था केली जाईल. इफ्फीच्या व्यवस्थेत कोणतीही कसूर राहू देणार नाही, अशी ग्वाही सावंत यांनी यावेळी दिली.