समीर नाईक, पणजी: शनिवारी रात्री १२ च्या सुमारास राज्यभर विजांच्या कडकडाटासह पावसाने थोड्या वेळासाठी हजेरी लावली होती, पण या व्यतिरिक्त दिवस भर मात्र कुठेच पाऊस पडला नाही. पण पावसाची लक्षणे पाहताच हवामान खात्याने दि. २१ मे पर्यंत राज्यात यलो अलर्ट कायम ठेवला आहे. यापूर्वी केवळ २० तारीखपर्यंत यलो अलर्ट जाहीर केला होता.
पुढच्या दोन दिवसांत केव्हाही पाऊस पडण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने मच्छिमाऱ्यांना समुद्रात न जाण्याची सूचना दिली आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवसात राज्यात दिवसभर दमट वातावरण पाहायला मिळाले. यातून उष्णताही प्रचंड वाढली आहे. मात्र पुढील दोन दिवसांत विजांच्या कडकडाटासह राज्यात ३० ते ४० किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा खात्याने दिला आहे.
यादरम्यान राज्यभर नाही, तर उत्तर आणि दक्षिण गोव्यातील काही भागात तुळरक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पण जास्त पावसाची शक्यता धारबांदोडा, केपे, सांगे व काणकोण या भागातच असल्याचे खात्याने सांगितले आहे. या अनुषंगाने किनाऱ्यावर जाण्याचे, खेळायचे आणि इतर जलक्रीडा उपक्रम करण्याचे टाळावे, अशी सूचना देखील हवामान खात्याने केली आहे.