लोकमत न्यूज नेटवर्क, कुंडई: पतंजली योगपीठ व श्रीदत्त पद्मनाभ पीठ यांच्यात अतूट नाते आहे. योगभूमी व तपोभूमी यामध्ये अद्वैत निर्माण झाले आहे. हिंदू धर्म संस्कृती व सनातन धर्मातील विविध घटकांना एकत्रित करून ज्ञान उपदेश तसेच हिंदूंना एकसूत्रात बांधण्याचे करण्याचे महान कार्य सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींनी केले आहे. तपोभूमी गुरुपीठ व परंपरेतील महापुरुषांनी ज्याप्रमाणे समाजाला संघटित करण्याचे महान कार्य केले तोच आदर्श घेऊन आपण कार्य करण्याची आवश्यकता असल्याचे स्वामी बाबा रामदेव यांनी मार्गदर्शनातून उद्बोधन केले.
श्रीदत्त पद्मनाभ पीठ श्रीक्षेत्र तपोभूमी येथे रविवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी श्रीक्षेत्र तपोभूमी कुंडई येथे 'हिंदू धर्मसभा' पद्मश्री सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या पावन अध्यक्षतेखाली तथा मार्गदर्शनाखाली आयोजित केली होती. या सभेला स्वामी रामदेव बाबा, आचार्य बालकृष्ण यांची उपस्थिती व मार्गदर्शन लाभले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, भारतीय शिक्षा बोर्डाचे चेअरमन श्री. सिंग, लोकमान्य संस्थेचे सर्वेसर्वा किरण ठाकूर, श्रीदत्त पद्मनाभ पीठ संचालक अॅड. ब्रह्मीदेवी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
स्वामी रामदेव बाबा, आचार्य बालकृष्ण यांनी उपस्थित मान्यवरांसोबत ब्रह्मानंदाचार्य स्वामीजींच्या समाधीचे आरती करून दर्शन घेतले. गोव्यातील विविध हिंदू संस्था, मंदिरे, मठ यांच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हिंदू धर्म सभा झाली.
- छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार करण्यासाठी श्रीक्षेत्र तपोभूमी कार्यरत आहे. गोवा भौगोलिक दृष्टीने लहान जरी असला तरी गोव्याबद्दल चर्चा मोठी होत असते. त्यामुळे संस्कृती संवर्धनाचे प्रत्येक गोमंतकीयांचे कर्तव्य आहे. गोव्याला तपोभूमी, योगभूमी म्हणून ओळख निर्माण करण्याची आपण सर्वांची जबाबदारी आहे, असे आचार्य बालकृष्ण यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
- पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीत राहून देखील आपली संस्कृतीचे कार्य तपोभूमी गुरुपीठ व सद्गुरु परंपरेने केले आहे. कित्येक हिंदूनी आपला धर्म वाचविण्यासाठी ही भूमी सोडली पण धर्म सोडला नाही, इतके धर्मनिष्ठ लोक या गोमंतकात वास करतात. हिंदू धर्म परिवर्तन होणार नाही यासाठी हिंदू संस्थांनीदेखील योगदान देण्याची आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मनोगतात म्हटले आहे.
- प्रत्येक संस्थेने व संघटनांनी आपापले कार्य जबाबदारीने करावे. मात्र ज्या वेळेला संघटनेची गरज आहे, त्यावेळी हिंदू या सदराखाली एकत्रित यावे.
- हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती महाराज ज्याप्रमाणे उभे राहिले, त्याप्रमाणे आजच्या काळात आपणही त्यांचा वारसा चालवि- ण्यासाठी एकत्रित येण्याची आवश्यकता आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीनिमित्त हिंदू संस्था व हिंदू मंदिर एकत्रित झालेली आहेत.
- साडेचारशे वर्षांची पोर्तुगीजांची जुलमी राजवट पुन्हा गोव्यात येणार नाही, यासाठी व हिंदू संस्कृती प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करूया. सरकार संस्कृतीचा प्रचार प्रसार करण्यासाठी सहकार्य करीत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे, असे ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींनी आपल्या आशीर्वचनातून संबोधित केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"