- वासुदेव पागी पणजी : २००८ साली गोव्यात पतंजली संस्थेचे अखिल भारतीय प्रमुख योगगुरू रामदेव बाबा यांचे आगमन झाले व तिथेच योग नावाची चळवळीची बीजे पेरली गेली. तेव्हापासूनच्या बारा वर्षांच्या काळात योग प्रत्येक गावात नव्हे तर प्रत्येक घरात पोहोचला आहे. तो प्रत्येक गावात पोहोचविण्याचे पतंजली संस्थेचा संकल्प आहे. धर्म नावाच्या भेदाच्या भिंतीही पाडल्या गेल्या आहेत. ख्रिस्ती व मुस्लीम समाजातील सक्रिय कार्यकर्ते योग शिक्षक म्हणून पतंजली संस्थेचे काम करीत आहेत, अशी माहिती पतंजली संस्थेचे उत्तर गोव्याचे प्रमुख सुशांत तांडेल यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यांच्याशी साधलेला संवाद ...
प्रश्न: गोव्यात योगाचा प्रसार आवश्यक त्या प्रमाणात झाला आहे काय?उत्तर : खूप मोठा प्रसार झालेला आहे. आज गोव्यात योग सर्व गावातच नव्हे तर घरागरांत पोहोचलेला आहे. तो प्रत्येक माणसापर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट पतंजली संस्थेने ठेवले आहे. त्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते काम करीत आहेत.प्रश्न : योग हा खूप प्राचीन आहे, पतंजलीचे गोव्यात योगदान काय?उत्तर : योग हा अनादीकाळापासून आहे हे खरे आहे; परंतु मध्यंतरीच्या काळात त्यावर दुर्लक्ष झाले होते. त्याचा प्रचार व प्रसार होण्याची गरज होती. २००८ साली गोव्यात योगगुरू रामदेव बाबा यांचे आगमन झाले आणि तिथेच योग नावाच्या चळवळीची बीजे पेरली गेली. सध्या ही चळवळ मोठी झाली आहे. योगाचे महत्त्व लोकांना पटलेले आहे.प्रश्न : योगासाठी गोव्यात पतंजलीचे योगदान काय?उत्तर : गोव्यात योगाचा प्रचार व प्रसार करण्याचे काम पतंजली संस्थेकडून सुरू आहे. एकूण अडीच हजार योग शिक्षक आहेत. ४०० जण सक्रिय आहेत. नेहमी सकाळी ५ ते ६ पर्यंत ते कोणताही मोबदला न घेता लोकांना योग शिकवीत आहेत. काहीजण संध्याकाळीही योगा शिकविण्यात व्यस्त असतात. सातत्याने चालविलेली ही साधना आहे. लोकांचे आरोग्य राखण्याचे काम योग करीत आहे. हे काम प्रत्यक्ष दिसून येत आहे.प्रश्न : ख्रिस्ती व मुस्लिमांचा योगाबद्दलचा कोणता दृष्टिकोन आहे?उत्तर : एकदम चांगला व सकारात्मक आहे. मला स्वत:ला योग शिकविण्यासाठी कॉन्वेंट स्कूलमधून आग्रहाने बोलाविले जात आहे. योगामुळेच अनेक चर्च संस्थांतील लोकांशी माझे चांगले संबंध निर्माण झाले आहेत. गैरसमज दूर होत आहेत. मुस्लिमांचे सांगायचे झाल्यास मुस्लीम केवळ योग करतात, असे नव्हे तर योग शिक्षक पतंजलीला जोडले गेलेले आहे. केवळ शिक्षकच नव्हे तर शिक्षिकाही आहेत. तसे पतंजली संस्थेत जबाबदारीची पदे सांभाळत आहेत. निरोगी गोवा घडताना मला दिसत आहे. तो योगाच्या माध्यमातून होताना दिसत आहे.