म्हापसा : गोवा सरकार मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विकास करत आहे. यासाठी केंद्र सरकारचे मोठे सहकार्य मिळत आहे. १९ डिसेंबरपर्यंत मुक्तीच्या ६० व्या वर्षी राज्य स्वयंपूर्ण करण्याचा निर्धार केला असून त्या दृष्टी सरकरची पाऊल पडत आहे. यासाठी राज्यातील जनतेने सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. कोलवाळ येथे ‘सरकार तुमच्या दारी’ या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. १९ डिसेंबर २०२० रोजी ‘स्वयंपूर्ण गोवा’ हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. पण महामारीमुळे लोकांपर्यंत पोहचणे शक्य झाले नाही. त्यामुळे लोकांपर्यंत जाण्याची गोव्याच्या मुक्तीची ६० वर्षे साजरी करताना जाणे योग्य असल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.यावेळी मुख्य सचिव परिमल राॅय, उत्तर गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय, महसूल सचिव संजय कुमार, आमदार नीळकंठ हळर्णकर, गोमेकॉचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर, आरोग्य खात्याचे संचालक डॉ. जुझे डिसा, उत्तर गोवा जि.प.च्या उपाध्यक्षा दीक्षा कानोळकर, कोलवाळ सरपंच नित्यानंद कांदोळकर, पीर्ण सरपंच रिचा नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.विविध खात्यांच्या १५२ हून जास्त सरकारी योजना आहेत. त्यातील अपवाद वगळता बहुतेक योजनांची माहिती लोकांना नाही. या योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात व त्यांचा लाभ लोकांना व्हावा या उद्देशाने सरकार तुमच्या दारी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रत्येक गाव स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकांनी विविध खात्यातील योजनांचा लाभ घेऊन स्वयंरोजगारावर भर द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.यावेळी नीळकंठ हळर्णकर यांनी सरकारच्या कार्यक्रमाची स्तुती केली. ज्यावेळी आपण काँग्रेसचा त्याग करून भाजपात प्रवेश केला त्यावेळी आपण चूक केली असल्याचे वाटत होते. पण आपण जे धाडस केले त्याचे सार्थक झाल्याचे आपल्याला वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. दीक्षा कानोळकर यांनी आभार मानले.
'तुम्ही साथ द्या, गोवा स्वयंपूर्ण बनवू'; ‘सरकार तुमच्या दारी’ योजनेचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2021 2:34 PM