दुर्गाश्री सरदेशपांडे, पणजी, गोवाविनोद व सरयू दोशी फाऊंडेशनतर्फे प्रयोगशील नाट्यकलेच्या जीवंत आविष्कारासाठी देण्यात येणारी प्रतिष्ठित फेलोशिप यंदा गोव्याचे युवा नाटककार कौस्तुभ नाईक यांना मिळाली आहे. भारतीय रंगमंचावरील प्रसिध्द नाटककार विजय तेंडुलकर आणि पं. सत्यदेव दुबे यांच्या नावाने ही फेलोशिप दिली जाते. या पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र व एक लाख रुपयांचे मानधन असून हा पुरस्कार मिळालेला कौस्तुभ नाईक एकमेव गोमंतकीय कलाकार आहे. यानिमित्त कौस्तुभ नाईक यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला संवाद...१) गोव्यातील रंगभूमी व तिचे राजकीय महत्त्व यासंदर्भात आपण नेमके कशाप्रकारे काम केले आहे.उ. एमए आणि एमफिलच्या शोधप्रबंधासाठी गोव्यातील तियात्र आणि मराठी ऐतिहासिक नाटकांचा अभ्यास केला. तियात्र मध्ये प्रचलित झालेली कथनशैली, अमाप लोकप्रियता आणि कालानुरूप तियात्रातून होणारी परखड राजकीय टीका याविषयी हा प्रबंध होता. गोव्याचा एकूणच इतिहास, गोव्यातील कॅथॉलिक समाजातील लोकांचे मुंबईत झालेले स्थलांतरण, मुंबईत तियात्रचा उगम होण्यासाठीची पूरक परिस्थिती ते आधुनिक काळातील तियात्रातून उमटणारा एक विशेष विद्रोही सूर या सर्वांचा उहापोह मी केला आहे. गोवा राज्य भारतात सामील झाल्यानंतर आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या सत्ताग्रहणानंतर गोव्यातील कॅथॉलिक समाजात जो एक राजकीय पेच निर्माण झाला यावर माझा विशेष भर होता. विसाव्या शतकात राज्यात प्रचंड लोकप्रिय झालेल्या मराठी ऐतिहासिक नाटके व त्यांचा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या लोकप्रियतेतलं नात्याचा शोध या प्रबंधात घेतला आहे. विसाव्या शतकात गोव्यातील बहुजन समाजातील घटक समूह मराठा अस्मिता स्थापण्यात गुंतले होते. त्यामुळे शिवाजी हे एका पुनरुत्थानवादी चळवळीचे प्रतीक बनले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती आदरयुक्त भावना तसेच त्यांच्या प्रचलित इतिहासाला तळागाळातील लोकांपर्यंत पोचविण्यासाठी नाटक हे गोव्यात प्रभावी माध्यम ठरले. याच संचिताच्या जोरावर मगो पक्षाचे बहुजनवादी राजकारण समजण्याचा हा प्रयत्न होता. हे दोन्ही प्रबंध लवकरच रिसर्च पेपर म्हणून छापून येणार आहेत.२) गोव्यातील नानाविध उत्सवातील हौशी-नौशी रंगभूमीवर विनोदाच्या नावाखाली चाललेल्या चाळ््यांकडे आपण कसे पाहता. तियात्रची स्थितीही अशीच आहे. आपण काय सांगाल.उ. मूळातच लोकप्रचलित कलाप्रकारांचे किती नैतिक मूल्यमापन करावे किंवा कितपत गरजेचे आहे, याबाबत मी जरा साशंक आहे. टीव्हीमुळे आठवडाभर सुमार विनोदाचा मारा आपल्यावर चालू असतो. विनोदाचा एकूणच स्तर ढासळत चाललाय हे मान्य पण केवळ नाटकाला त्यासाठी जबाबदार धरणे यावर विचार करायला हवे. कोकणी नाटकांबद्दल असे विचार व्यक्त होतात. येणाऱ्या स्थित्यंतरामुळे नाटकाच्या लोकप्रियतेची परिमाणे बदलतात का याविषयी मला अधिक रस आहे.३) गोमंतकीय रंगभूमी अशी स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे का.गोमंतकीय रंगभूमी अशी स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. पण तिची नेमकी व्याख्या, परिभाषा आणि आवाका अजून बंदिस्त नाही. गोमंतकीय रंगभूमी म्हणजे तियात्र, मराठी रंगभूमी (हौशी, उत्सवी), कोकणीतील निम्न व्यवसायिक रंगभूमी असे अनेक अर्थ एकाच वेळी निघू शकतात. सगळ्यांनाच गोमंतकीयपण क्लेम करण्याचा तेवढाच हक्क आहे. भारतात प्रादेशिक रंगभूमी भाषावार विभागली आहे पण त्यावर प्रांतीय सीमांचा पगडा आहे. त्यामुळे मराठी रंगभूमीचा इतिहास हा प्रामुख्याने महाराष्ट्रात (आणि त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्रात) केंद्रित केला जातो. बडोदा ते तंजावर, इंदोर, गोवा, बेळगाव या भागांतील इतिहास त्यात क्वचितच आढळतो. तसेच कोकणी रंगभूमीमध्ये तियात्रची जागा काय, प्रमाण कोकणीवाले त्याला एक वैध नाट्यप्रकार मानतात का हेही प्रश्न विचारावे लागतील. गोमंतकीय रंगभूमीची व्याख्या तेवढीच सर्वसमावेशक आणि व्यापक करता येईल पण त्यादृष्टीने अजून खूप प्रयत्न झाले पाहिजे.