लोकमत न्यूज नेटवर्क
वास्को: मोटरसायकलवरून रासई ते केळशी - कुठ्ठाळी येथे जाताना अश्वनी दुलारे चौहाण या २८ वर्षीय तरुणाचा दुचाकीवरील ताबा जाऊन रस्त्याच्या बाहेर असलेल्या वीज खांब्याला दुचाकीने धडक देऊन झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. सोमवारी (दि. ३१) सकाळी झालेल्या या अपघातात अश्वनी याच्या डोक्याला व अंगाच्या इतर भागांना गंभीर जखमा झाल्यानंतर त्याला उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले असून येथे उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे यांनी दिलेल्या माहीतीनुसार सोमवारी सकाळी १०.३० च्या सुमारास हा अपघात घडला. अश्वनी हा तरुण कामाच्या निमित्ताने रासई येथे राहत असून तो मूळ उत्तरप्रदेश येथील रहीवाशी आहे. सोमवारी सकाळी तो दुचाकीवरून (जीए ०६ व्हाय ११४९) रासईहून केळशी येथे जात होता. जेव्हा तो उड्यार - केळशी भागाच्या रस्त्यावर पोचला त्यावेळी त्याचा दुचाकीवरील ताबा जाऊन दुचाकी रस्त्याच्या बाहेर पोचून येथे असलेल्या वीज खांब्याला जबर धडकली. या अपघातात अश्वनी याच्या डोक्याला व अंगाच्या इतर भागांना गंभीर जखमा झाल्याची माहीती पोलीसांनी दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या अश्वनी याला नंतर त्वरित बांबोळी येथील गोमॅकॉ इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथे त्याच्यावर उपचार चालू असताना तो मरण पोचल्याची माहीती पोलीसांनी दिली. मरण पोचलेला अश्वनी हा रासई येथील एका डॉकमध्ये (जहाज दुरूस्ती - बांधणी यार्ड) ‘फेब्रीगेटर’ म्हणून कामाला होता अशी माहीती पोलीसांकडून प्राप्त झाली आहे. तो रासई येथे एका ठीकाणी भाड्याने राहत असून त्याची पत्नी व कुटूंबातील इतर सदस्य उत्तरप्रदेश येथील त्यांच्या गावी राहतात. वेर्णा पोलीसांनी सदर अपघाताचा पंचनामा केला असून याप्रकरणात अधिक तपास चालू आहे.