Goa Accident : गोव्यात अपघाताची विचित्र घटना समोर आली आहे. पणजीच्या सांतहस्तेव बेटावरील धावजी फेरी धक्क्यावर शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास भरधाव वेगात असलेली कार नदीत कोसळली. कारमधील तरुणीने प्रसंगावधान दाखवून वेळीच कारमधून बाहेर पडत जीव वाचवला. मात्र, चालक तरुण कारसह बुडाला. वासुदेव भंडारी असे या तरुणाचे नाव असून तो गुजरातचा रहिवासी असल्याचे समोर आलं आहे. मध्यरात्री माशेल येथे झालेल्या अपघातानंतर तरुणीने गाडीतून बाहेर पडत याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायब झालेल्या तरुणाने गुगल मॅपची मदत घेत कार चालवल्याने रस्ता चुकून ही दुर्घटना घडली. अग्निशमन दल, पोलीस आणि नौदलाच्या पाणबुड्यांनी अथक प्रयत्नांनी कार पाण्यातून बाहेर काढली. मात्र, बुडालेल्या तरुणाचा शोध अद्याप लागलेला नाही. शनिवारी रात्री दीडच्या सुमारास सांतइस्तेव बेटावरील फेरी धक्क्यावर भरधाव वेगाने आलेली कार पाण्यात कोसळली. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी आले आणि त्यांनी शोधमोहीम सुरू केली.
अपघातातून बचावलेल्या तरुणीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. भरुच येथून वासुदेव भंडारी हा तरुण साखळी येथे आपल्या मैत्रिणीला भेटायला आला होता. ही तरुणीही गुजरातमधील असून ती साखळीतील मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शिकत आहे. शनिवारी दोघेही भाड्याच्या गाडीने गोव्यात फिरत होते. त्यानंतर भंडारीच्या भरधाव कारची मध्यरात्री माशेल येथे एका सेदान कारशी धडक झाली. त्यानंतर सेदान कार चालकाने भंडारीच्या गाडीचा पाठलाग सुरु केला. त्यामुळे दोघेही घाबरले. वासुदेवने गुगल मॅपची मदत घेत कार पुढे नेण्याचा प्रयत्न केला. कार वेगात नेण्याच्या प्रयत्नात ते सांतइस्तेव येथील फेरी धक्क्यावर पोहोचले. काळोखात रस्त्याचा अंदाज न आल्याने त्यांची कार थेट नदीच्या पाण्यात गेली. पाणी कारमध्ये शिरू लागल्याने प्रसंगावधान राखत तरुणीने बाहेर उडी मारली. मात्र वासुदेव गाडीतच अडकून पडला.
बऱ्याच प्रयत्नांनी क्रेनच्या साहाय्याने रविवारी दुपारी ही कार पाण्यातून बाहेर काहण्यात आली. कारमध्ये दोन ते तीन बॅगा, लॅपटॉप व इतर साहित्य सापडले. मात्र, वासुदेवचा शोध लागला नाही. वासुदेवच्या स्वीफ्ट कारने १ वाजून ५ मिनिटांनी सेडान कारला धडक दिली.. या अपघातानंतर ते तिथे न थांबता थेट पणजीकडे निघाले. अपघातानंतरही न थांबल्याच्या रागातून सेडान कारच्या चालकाने त्यांचा पाठलाग केला. त्यामुळे वासुदेव आणि त्याची मैत्रिण घाबरली. त्यानंतर भरधाव वेगात कार सांत इस्तेव्ह येथील फेरीवरून नदीच्या पाण्यात घुसली. पोलीस मात्र तरुणीचे म्हणणं खरं आहे की नाही हे तपासण्यासाठी सीसीटीव्हीची तपासून पाहत आहेत.
दरम्यान, कार नदीत कोसळ्यानंतर आपण बाहेर पडण्याची माहिती पोलिसांना दिली. तसेच वासुदेव हा कारमधून बाहेर आला होता असेही तिने पोलिसांना सांगितले. त्यामुळे गोवा पोलिसांनी त्याला शोधण्याची मोहीम मोहीम सुरू ठेवली आहे. वासुदेवाच्या मित्राच्या तक्रारीवरून बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.