लोकमत न्यूज नेटवर्क वाळपई : इस्रोने चंद्रावर विक्रम लँडर यशस्वीपणे उतरविल्यानंतर जगभरातून त्याचे कौतुक झाले. त्याचबरोबर चंद्रावर जमीन खरेदी करण्याचा नवा ट्रेंडही जोमाने सुरू झाला. यामध्ये आता गोमंतकीयही उतरले आहेत. ठाणे सत्तरी येथील पराग देसाई या तरुणाने चंद्रावर चक्क एक एकर जमीन खरेदी केली आहे. या खरेदीचे करारपत्रही त्याला मिळाले आहे.
बॅचलर इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन्सचे शिक्षण घेतलेले पराग हे सध्या जर्मनीमध्ये यूएसएच्या डिपार्टमेंट ऑफ डिफेन्समध्ये नेटवर्क ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून काम करत आहेत. ठाणे येथे त्यांची 'मोकासा प्रकारातील जमीन आहे. आता त्यांनी चंद्रावरील त्यांच्या जमिनीच्या मालमत्तेची माहिती सोशल मीडियावर दिली आहे.
चंद्रावर 'मॅनिलियस क्रेटर' या ठिकाणी देसाई यांनी १ एकर जमीन खरेदी केली आहे. त्यांनी ही जमीन द लूनर रजिस्ट्रीमधून खरेदी केली आहे. चंद्रावर प्लॉट खरेदी करण्यामागील आपली भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. ते म्हणाले, 'माझा विश्वास आहे की चंद्रावर जमीन खरेदी करणे हा अवकाश आणि मोठ्या विश्वाशी जोडण्याची भावना प्रदान करण्याचा एक मार्ग आहे. अंतराळ तंत्रज्ञानाच्या सध्याच्या स्थितीचा अर्थ असा आहे की चंद्राच्या गुणधर्मांवर मानवाची भौतिक उपस्थिती असेल आणि मानव वसाहती स्थापन करतील किंवा चंद्रावर ऑपरेशन करतील.
चंद्रावर जमिनीचा तुकडा असणे, हे मानवतेच्या महत्त्वाकांक्षेला नावीन्यपूर्णतेला आणि अज्ञात शोधण्याच्या इच्छेला समर्थन देण्याशिवाय काहीही करत नाही. भविष्यातील आंतरराष्ट्रीय करारातून चंद्रावरील दूतावास मालमत्ता अधिकार कसे रूपांतरित केले जातील हे ठरवले जाईल, असे देसाई यांनी म्हटले आहे.
अशी करता येते जमीन खरेदी
चंद्रावर कोणीही जमीन खरेदी करू शकतो. लुनार सोसायटी इंटरनॅशनल आणि इंटरनॅशनल लुनार लँड्स या कंपन्यांच्य माध्यमातून चंद्रावरील जमिनीची ऑनलाइन खरेदी करता येते. त्यांच्या वेबसाईटवर जाऊन यासाठी आपल्याला नोंदणी करावी लागते. ठरावीक रक्कम देऊन तुम्ही जमीन खरेदी करू शकता. याच प्रक्रियेतून भारतीय लोकही चंद्रावर जमीन खरेदी करीत आहेत.
अनेकांनी केली आहे खरेदी
चंद्रावर जमीन खरेदी करणाऱ्यांमध्ये अनेक उच्चपदस्थांचा समावेश आहे. बॉलिवूडचा प्रख्यात अभिनेता शाहरुख खान याचीही चंद्रावर जमीन आहे. मात्र, त्याने ही जमीन खरेदी केलेली नाही. त्याच्या एका चाहत्याने जमीन भेट दिल्याचे सांगण्यात येते. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतनेही चंद्रावर जमीन खरेदी केली होती. २००२ पासून जमीन खरेदीचा ट्रेंड वाढला. हैदराबाद, बंगळुरुच्या काही व्यावसायिकांनीही चंद्रावर जमीन खरेदी केली आहे.