लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसा: आपला भारत देश आज अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. आज आपल्याकडे तरुण शक्ती मोठी आहे. हिंदू संस्कृती, भारतीय संस्कृती तरुणांनी नव्या दमाने, नव्या विचाराने जगापुढे मांडण्यास आरंभ केला आहे. या युवा शक्तीमुळे आज आपला भारत पुन्हा एकदा पुनर्जागरणातून जात असल्याचे मत तानाजी या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक ओम राऊत यांनी व्यक्त केले आहे.
नववर्ष स्वागत समिती, म्हापसा आयोजित सार्वजनिक गुढीपाडवा उत्सवानिमित्त प्रमुख व्यक्ते या नात्याने भारताचे पुनर्जागरण या विषयावर उपस्थित जनसमुदायासमोर ते मार्गदर्शन करताना बोलत होते. यंदाचे उत्सवाचे हे २०वे वर्ष होते. यावेळी त्यांच्या सोबत मंचावर अध्यक्ष अमेय नाटेकर, कार्यवाह विनय वालावलकर तसेच इतर सदस्य उपस्थित होते.
प्रारंभी गुढी पाडव्यानिमित्त शहरातून शोभायात्रेचे आयोजन केले होते. शोभायात्रेला मारुती मंदिराजवळून प्रारंभ करण्यात आला, तर टॅक्सी स्थानकावर शोभायात्रेची सांगता करण्यात आली. यात विविध पथके सहभागी झाली होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी अमेय नाटेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर विनय वालावलकर यांनी आभार प्रदर्शन केले.
सकाळच्या मुख्य कार्यक्रमानंतर संध्याकाळी कला आणि संस्कृती संचालनालय पुरस्कृत विद्या प्रबोधिनी शिक्षण संस्था, पर्वरी प्रस्तुत गोमंत गाज हा गोमंतकातील लोककलांचा लालित्यपूर्ण कार्यक्रम सादर करण्यात आला. यात १०० हून अधिक कलाकार सहभागी झाले होते.
तंत्रज्ञानाद्वारे हिंदू संस्कृती युवा पिढीपर्यंत पोहोचवा
नवीन तंत्रज्ञानाचा नवीन विषयांचा वापर करून आपण धर्माच्या ज्या गोष्टी आहेत, त्या आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचू शकलो, तर आपण खऱ्या अर्थानि पुनर्जागरणाचा भाग होऊ, असे आपल्याला वाटत असल्याचे ओम राऊत म्हणाले. त्यासाठी आपल्या संस्कृतीचा विकास करायला हवा. संपूर्ण विश्वात आपली संस्कृती ती कशा पद्धतीने जाईल, याचा आपण विचार करायला हवा, जेव्हा आपण हे करू शकू तेव्हाच आपण या पुनर्जागरणाचा एक भाग बनू शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"