लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : देश जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत असताना देश प्रथम ही भावना वृद्धिंगत करून युवकांनी आगामी काळात देशाची धुरा सांभाळण्यासाठी आतापासूनच सक्षम होण्याची गरज आहे. त्यासाठी संघटित प्रयत्न करून सर्व क्षेत्रात उत्तुंग यश संपादन करताना देशाला वैभवच्या शिखरावर नेण्यासाठी युवा पिढीची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी न्हावेली-साखळी येथे केले.
भाजप साखळी मतदारसंघ युवा मोर्चातर्फे रविवारी हर घर तिरंगा जागृती रॅलीचे आयोजन न्हावेली ती साखळी यादरम्यान करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात अनेक क्षेत्रात देशाने मोठी कामगिरी बजावलेली आहे. 'विकसित भारत-आत्मनिर्भर भारत'साठी मोठे देशाला अधिक भक्कम करण्यास कारणीभूत ठरणारी असल्याने प्रत्येक भारतीय मनात देश प्रथम ही भावना रुजवणे गरजेचे आहे. त्याच हेतूने हर घर तिरंगा ही संकल्पना असून सर्व घटकांनी देशाच्या जडणघडणीत योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
स्वतः दुचाकीवर बसून मुख्यमंत्र्यांनी न्हावेली ते साखळी दरम्यानच्या जागृती रॅलीमध्ये सहभाग घेऊन युवाशक्तीचा उत्साह वाढवला. भारत मातेचा जय जयकार करणाऱ्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, नागरिक सहभागी झाले होते.