पणजी : सामाजिक राजकारणात युवकांची गरज असून, त्यांनी राजकारणाकडे करिअर आणि सकारात्मक दृष्टिने पाहिले पाहिजे. त्याचबरोबर आमदारांना केवळ समाजसेवेचे काम नसते तर त्यांनाही लोकोपयोगी कायद्यांची निर्मिती करण्यासाठी वेळ द्यावा लागतो, याचे भान समाजाने ठेवणो अपेक्षित आहे, असे मत सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.
राज्य विधीमंडळ खात्यातर्फे येथील गोमंतक मराठा समाजाच्या सभागृहात आयोजिलेल्या पहिल्या एकदिवसीय युवा संसदेला शुक्रवारी सुरुवात झाली. सभापती प्रमोद सावंत आणि नगरविकास खात्याचे मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या हस्ते घटानांद करून या संसदेस प्रारंभ झाला. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार प्रसाद गावकर, माजी सभापती मोहन आमशेकर, नेहरू युवा केंद्राचे प्रमुख कालिदास घाटवळ, विधीमंडळ खात्याचे सचिव एन. बी. सुभेदार, माजी आमदार सदानंद मळीक, व्हिक्टर गोन्साल्विस यांची उपस्थिती होती.
डॉ. सावंत म्हणाले की, राज्य सरकारच्यावतीने ‘युवा संसद’हा कार्यक्रम दरवर्षी होईल आणि एका-एका तालुक्यात केला जाईल. ज्यामुळे त्या-त्या तालुक्यातील युवकांना त्यात सहभागी होता येईल. युवकांना लोकसभेचे, विधानसभेचे कामकाज कशा पद्धतीने चालते, हे त्यातून दिसते. युवा पिढी राजकारणाकडे करिअर म्हणून पाहत नाही. सामाजिक राजकारणात युवकांचा सहभाग महत्त्वाचा असून, राजकारणाकडे युवकांनी सकारात्मकदृष्टीने, त्याचबरोबर करिअर म्हणूनही पाहिले पाहिजे. याप्रसंगी मंत्री डिसोझा यांचे भाषण झाले. सचिव सुभेदार यांनी ‘युवा संसद’ कार्यक्रम योजनेमागील उद्देश स्पष्ट केला.