पणजी : राज्यात येत्या 22 मार्च रोजी जिल्हा पंचायत निवडणूक होईल व त्यासाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास येत्या 27 रोजी आरंभ होईल. राज्यभर जिल्हा पंचायत निवडणुकीची आचारसंहिता आजपासून लागू झाली. ही घोषणा राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त आर. के. श्रीवास्तव यांनी येथे केली.
श्रीवास्तव यांनी मेल्वीन वाझ, गुरुदास देसाई, सागर गुरव यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. जिल्हा पंचायत निवडणुका जरी पालिका व महापालिका क्षेत्रत होत नसल्या तरी, निवडणूक आचारसंहिता मात्र पूर्ण राज्यात लागू झाली आहे, असे श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले. उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास दि. 5 मार्च ही शेवटची मुदत आहे. सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. एकूण पंधरा निर्वाचन अधिका-यांची नियुक्ती आयोगाने केली आहे. 22 रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल.
दुस-याच दिवशी म्हणजे 23 रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला आरंभ होईल. एकूण नऊ हजार कर्मचारी व पोलीस निवडणूक कामाशीसंबंधित प्रक्रियेत सहभागी होतील. एकूण 1 हजार 237 मतदान केंद्रे आहेत.
एकूण 8 लाख 29 हजार मतदार उत्तर गोव्यात पंचवीस व दक्षिण गोव्यात पंचवीस मिळून एकूण पन्नास जिल्हा पंचायत मतदारसंघात निवडणुका होतील. एकूण मतदारसंख्या 8 लाख 29 हजार 876 आहे. जिल्हा पंचायत मतदारसंघात सरासरी 16 हजार 6क्क् मतदार आहेत. मात्र उत्तर गोव्यात सर्वात कमी मतदार हे पाळी मतदारसंघात (14 हजार 196) आहेत. उत्तरेत सुकूर मतदारसंघात सर्वात जास्ती म्हणजे 22 हजार 505 मतदार आहेत.
दक्षिण गोव्यात सर्वात जास्त मतदार सांकवाळ मतदारसंघात (23 हजार 286) आहेत. तिथे सर्वात कमी मतदार उसगाव गांजे मतदारसंघात (11 हजार 344) आहेत. निवडणुका पक्षीय पातळीवर होतील. उमेदवारांना पाच लाख रुपयांची खर्च मर्यादा आहे.सरकारने एकूण पन्नास मतदारसंघांपैकी 31 मतदारसंघ विविध घटकांसाठी आरक्षित केले आहेत.
सर्वसाधारण वर्गातील उमेदवाराला उमेदवारी अर्ज भरताना निर्वाचन अधिका-याकडे पाचशे रुपयांची अनामत रक्कम ठेव म्हणून सादर करावी लागेल. महिला व अन्य आरक्षित उमेदवाराला तीनशे रुपयांची रक्कम सादर करावी लागेल.