लोकमत न्यूज नेटवर्क पणजीः पेडणेचा झोन प्लॅन अंतिम अधिसूचित करण्यासाठी सरकारला कोणतीही घाई नाही. सर्वसामान्य जनता, सरपंच, पंच, आमदार या सर्वांना विश्वासात घेऊन हरकती, सूचनांवर विचार करुनच आराखडा निश्चित केला जाईल, असे नगर नियोजनमंत्री विश्वजित राणे यांनी स्पष्ट केले.
आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने विश्वजित यांची भेट घेतली त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री म्हणाले की, हा झोन प्लॅन सर्वसमावेशक असेल. कोणालाही अंधारात ठेवले जाणार नाही. जनतेकडून हरकती, मागवण्यात आलेल्या आहे. प्रत्येक हरकती, सूचनांची छाननी केली जाईल. आम्ही घाई नाही. हरकती, सूचनांवर विचार विनिमय करू. त्यानंतर पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर, पंच, सरपंच, उपसरपंच, झेडपी यांची पुन्हा बैठक घेऊन व त्यानंतरच निर्णय घेऊ सामान्य माणसाला दिलासा देणाराच झोन प्लॅन आम्ही देऊ, असेही राणे यांनी सांगितले.
तोरसेच्या सरपंचाने महार्गानजीक विकास व्हावा या दृष्टीने झोन प्लॅनमध्ये काही बदल सूचवले आहेत धारगळच्या एका पंचानेही काही घरांच्या बाबतीत प्लॅनमध्ये बदल सूचवले आहेत. त्यावर आम्ही अवश्य विचार करू. लोकांनी त्यांच्या हरकती, सूचना खात्याला पाठवाव्यात. सल्लागाराच्या माध्यमातून पेडणेतील लोकांना झोन प्लॅनबद्दल सविस्तर माहिती दिली जाईल. आवश्यक तेथे सादरीकरणही केले जाईल, असेही राणे म्हणाले.
जोपर्यंत हा आराखडा लोकांना आपला वाटत नाही तोपर्यंत अंतिम अधिसूचना काढणार नाही. तसे आश्वासनही मी आमदार प्रवीण आर्लेकर यांना दिले आहे, असे विश्वजित यांनी सांगितले.
...तर बेकायदा कृत्ये उघड करेन
विश्वजीत राणे म्हणाले की, आमदार जीत आरोलकर यांना स्वतःची एक लाख चौरस मीटर जमीन रूपांतरित करुन घ्यायची होती. त्यासाठी ते विनंती. करण्यासाठी माझ्या घरी आले होते. परंतु मी स्पष्टपणे हा प्रस्ताव फेटाळून लावला. राणेंनी ही फाइलही पत्रकारांना दाखवली, जीत यांनी अनेक बेकायदा कामे केलेली आहेत. त्यांचे एक व्हिडीओ रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. ते पुढील विधानसभा अधिवेशनात परवानगी घेऊन उघड करीन, असा इशाराही त्यांनी दिला.
आरोलकर म्हणतात...
राणे यांच्या फाइल्स दाखवण्याच्या धमक्यांना घाबरत नाही. झोन प्लॅनमध्ये अन्याय झाल्याने लोक माझ्याकडे आले. त्यामुळे मी त्यांना पाठिंबा दिला. माझ्या तीन पॉपर्टीबाबत राणे बोलत असतील तर मी आठ दिवसांपूर्वीच स्पष्ट केले आहे की, लोकांवर अन्याय करणारा प्लॅन लादत असाल तर या माझ्या पॉपर्टी मंजुरीतून बाहेर काढा. विजय सरदेसाई हे नगरनियोजनमंत्री असताना मी जमीन रुपांतरासाठी अर्ज केला होता. परंतु तेव्हा काही भू रुपांतर झाले नाही. मंत्र्यांनी मला ब्लॅकमेल करू नये. मांद्रेत येऊन पाचपट मोठी जाहीर सभा घेण्याच्या आव्हानाबद्दल जीत म्हणाले की, कोणाला जर दुसऱ्याच्या मतदारसंघात येऊन असा हस्तक्षेप करायचा असेल तर ती त्यांची मर्जी विश्वजित सत्तरीत जसे प्रत्येक प्रश्नावर जनतेसोबत राहतात तसा मी पेडणेतील लोकांसोबत राहीन.
२०० मतांनी निवडून आलेल्यांनी शिकवू नये
जीत यांनी शेतजमिनीत बेकायदेशीररित्या फार्म हाऊस बांधलेले आहे ते पाडण्याठी कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश मी नगर नियोजन अधिकाऱ्यांना दिलेला आहे. हे बेकायदा फार्म हाऊस जमीनदोस्त केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. नगर नियोजनमंत्री म्हणून मी जे काही करतोय ते जनतेच्या हिताचेच आहे. केवळ २०० मतांनी निवडून येऊन आमदार बनलेल्यांनी मला शिकवू नये, असा टोलाही राणेंनी लगावला.
जनतेला विश्वासात घेणारच : मुख्यमंत्री
झोन आराखड्याच्या अंतिम निश्चितीपूर्वी सरकार जनतेला विश्वासात घेईल, असे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले. लोकांच्या सूचना आणि आक्षेपांसाठी तो खुला आहे. लोकांना त्यांचे मत देऊ द्या; आम्ही लोकांना विश्वासात घेऊ. ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जमिनींच्या झोनिंगचा प्रारूप आराखडा उपलब्ध करून दिला जाईल. तसेच मोपा ओडीपी हे मोपा विमानतळ क्षेत्रापुरते मर्यादित असून ते मोपा विमानतळ क्षेत्राबाहेर लागू होत नाही, असेही सावंत म्हणाले.