लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : परिसीमनानंतर २००८ मध्ये हा मतदारसंघ अस्तीत्त्वात आला तेव्हापासून या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व आहे. मागील दहा वर्षांपासून राजकुमार बडोले हेच या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहे. भाजपने त्यांना पुन्हा यंदा तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. या संधीचा फायदा घेऊन ते विजयाची हॅट्रीक मारतात की या मतदारसंघातील मतदार नवा गडी नाव डाव हे सूत्र अवलंबितात हे देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे.जिल्ह्यातील चारही मतदारसंघाचा विचार केल्यास सर्वात कमी उमेदवार ८ उमेदवार अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात रिंगणात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी युती आणि आघाडीच्या नेत्यांना त्यांच्या पक्षातील बंडखोर उमेदवारांचे मन वळविण्यात यश आले. त्यामुळे बंडखोरी नसलेला हा एकमेव मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून भाजप-सेना युतीकडून राजकुमार बडोले तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून मनोहर चंद्रिकापुरे,वंचित बहुजन आघाडीकडून अजय लांजेवार आणि बसपाकडून शिवदास साखरे हे निवडणूक रिंगणात आहे. एकूण आठ उमेदवार जरी निवडणूक रिंगणात असले तरी थेट लढत ही युतीचे राजकुमार बडोले आणि आघाडीचे मनोहर चंद्रिकापुरे यांच्यात होणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाडी नव्हती. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन झाले होते. काँग्रेसचे राजेश नंदागवळी यांनी ३४१०६ ही दुसºया क्रमांची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोहर चंद्रिकापुरे यांनी ३१ हजार ८९३ मते घेतली. भाजपचे राजकुमार बडोले यांनी ६४ हजार ४०१ आणि शिवसेनेच्या किरण कांबळे यांनी १५ हजार ३३६ मते घेतली होती. एकंदरीत युती आणि आघाडी नसल्याने मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन झाले होते. मात्र या वेळी बंडखोरी नसल्याने आणि युती आणि आघाडी झाल्याने मतांचे विभाजन होण्याची शक्यता नाही.त्यामुळेच राजकुमार बडोले आणि मनोहर चंद्रिकापुरे यांच्यात थेट लढत होणार आहे. या रंगतदार सामान्यात जाचा पल्ला भारी होईल तो मतदारसंघावर राज्य करेल हे स्पष्ट आहे. राजकुमार बडोले यांनी साडेचार वर्ष सामाजीक न्याय विभागाचे मंत्री म्हणून केलेली कामे आणि पार पाडलेली कामगीरी, मतदारसंघातील मतदारांशी कायम ठेवलेला जनसंपर्क, साधा माणूस ही त्यांची प्रतिमा या त्यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत. तर मनोहर चंद्रिकापुरे हे मागील निवडणुकीत पराभूत होऊन सुध्दा मतदारसंघात सक्रीय होते. त्यांनी पाच वर्षाच्या कालावधीत हा मतदारसंघ पिंजून काढला आहे.शिवाय आघाडी झाल्याने मतविभाजनाचा धोका टळला आहे. त्यामुळे या गोष्टी त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरु शकतात. या मतदारसंघात २ लाख ५२ हजार ५९१ एकूण मतदार आहेत. जातीय समीकरण पाहता सर्वाधिक ६० टक्के मते ही सर्वसाधारण प्रवर्गातील आहे. वंचित आणि बसपाचे उमेदवार सुध्दा या मतदारसंघात बऱ्यापैकी मते घेऊ शकतात. यावर देखील विजयाचे समीकरण बऱ्याच प्रमाणात अवलंबून असणार आहे. राजकुमार बडोले यांना मतदार हॅट्रीक मारण्याची संधी देतात की मनोहर चंद्रिकापुरे यांना खाते उघडण्याची संधी देतात हे सुध्दा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मात्र या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीतीलच चित्र कायम राहिल्यास भाजप उमेदवारासाठी ती अनुकुल बाब ठरू शकते.
विजयाची हॅट्ट्रिक की नवा गडी नवा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 6:00 AM
जिल्ह्यातील चारही मतदारसंघाचा विचार केल्यास सर्वात कमी उमेदवार ८ उमेदवार अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात रिंगणात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी युती आणि आघाडीच्या नेत्यांना त्यांच्या पक्षातील बंडखोर उमेदवारांचे मन वळविण्यात यश आले. त्यामुळे बंडखोरी नसलेला हा एकमेव मतदारसंघ आहे.
ठळक मुद्देभाजप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारात सामना : रंगतदार लढतीकडे सर्वांचेच लक्ष : युती आघाडीमुळे टळणार मतांचे विभाजन