गोंदिया : कोरोनाच्या कठीण काळात कुणीही उपाशीपोटी राहू नये यासाठी राज्य शासनाने शिवभोजन थाळी सुरू केली. यासाठी मोठ्या प्रमाणात शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रचालकांना शासनाकडून प्रती थाळी अनुदान ठरवून देण्यात आले आहे. जिल्ह्यात २४ केंद्रांच्या माध्यमातून गरजूंसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली. या शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून २६ जानेवारी २०२० पासून आतापर्यंत ५ लाख नागरिकांना भोजन देण्यात आले. गरजूंचे पोट भरण्यासाठी शिवभोजन थाळी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. परंतु या शिवभोजन थाळीला मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्याने अनेक केंद्रांवरून दररोज १५ ते २० लोक उपाशी परत जात आहेत. राज्य शासनाच्या या उपक्रमाचा गरजूंना खरेच मोठा आधार झाला व त्यांच्या २ वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटला होता. आताही शिवभोजन थाळीच्या माध्यमातून गरजूंना जेवणाची सोय सुरूच आहे. मात्र, ग्रामीण भागात दररोज ७५ थाळी एका केंद्राला एका दिवसात वाटप करण्याच्या सूचना आहेत. परंतु उपाशी राहणारे लोक थाळीभोजन करण्यासाठी आले तरी दररोज काही लोक भोजनाशिवाय खाली परत जात आहेत.
..................................
रोज २००० लोकांचे पोट भरते; बाकीच्यांचे काय?
- जिल्ह्यात २४ शिवभोजन थाळी केंद्रे आहेत. यातून जिल्ह्यातील २०५० नागरिकांना दररोज जेवणाची सोय होते.
- शिवभोजन थाळीची मागणी करणारे हात अधिक आहेत. मात्र, केंद्र संचालकांना ७५ थाळींचीच परवानगी असल्याने इतरांना याचा लाभ मिळत नाही.
.................
जिल्ह्यातील एकूण शिवभोजन थाळी केंद्रे- २४
रोजच्या थाळी लाभार्थ्यांची संख्या- २०५०
शहरातील एकूण शिवभोजन थाळी केंद्रे- २
शहरातील रोज थाळी लाभार्थ्यांची संख्या- ४००
.....................
दररोजच्या थाळीसाठी अधिक लोक
आंबेडकर चौक (गोंदिया) : शहरातील आंबेडकर चौकात शिवभोजन थाळीकरिता १५ ते २० लोक अधिक येतात. परंतु थाळींची संख्या एवढे वाटप झाल्यानंतर पुन्हा वाढविण्यासाठी जेवण तयार नसते.
देवरी रोड (आमगाव) : शासनाने दिलेल्या संख्येनुसारच जेवण तयार होत असल्याने अधिकच्या लोकांना जेवण देता येत नाही. एक-दोघे असल्यावर त्यांना जेवण समाज भावनेतून दिले जाते. परंतु जास्त लोक आले तर त्यांना जेवण देण्यासाठी तयार नसते.
............