३१८६ कर्मचाऱ्यांचा सहभाग : १७ जानेवारी व २१ फेब्रुवारीला विशेष मोहीमगोंदिया : पोलिओमुक्त जिल्हा करण्यासाठी पुन्हा एकदा आरोग्य विभागाकडून जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. यात बुथवरील लसीकरणात ० ते ५ वर्षे वयोगटातील १ लाख ९ हजार ९२५ बालकांना डोज देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या मोहिमेत एकूण बुथची संख्या १३८७ राहणार असून ग्रामीण भागात १२६५ तर शहरी भागात १२२ बुथ राहतील. यासाठी ३१८६ मनुष्यबळाची नियुक्ती केली जाणार आहे. त्यात २८६ पर्यवेक्षक राहणार आहेत. यावर्षी १७ जानेवारी व २१ फेब्रुवारी रोजी लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भातील आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवि धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरीश कळमकर, निवासी वैद्यकीय अधिकारी विनोद वाघमारे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.आर.पी.गहलोत, पोलिओ सर्वेक्षण वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहम्मद साजिद उपस्थित होते.आयपीपीआय कृती योजनेअंतर्गत बुथवरील लसीकरणानंतर ग्रामीण भागात तीन दिवस व शहरी भागात पाच दिवस लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व क्षेत्रात पाडे, वस्त्या, विटभट्ट्या शेतात राहणारे मजूर, मुस्लिम वस्ती, मेंढपाळ, परप्रांतातून आलेले कुटुंबे, धाबे, शेतावरील घरे, बांधकामाची ठिकाणे, शहरालगतचा भाग, झोपडपट्या, ज्या भागात नकारार्थी लाभार्थ्याचे कार्यक्षेत्र आहे, प्राथमिक लसीकरण कमी आहे अशा ठिकाणी व अशा सर्व क्षेत्रात घरोघरी लसीकरण राबविण्यात येणार आहे. पोलिओ समुळ नष्ट होवून मोहीम यशस्वी होण्याकरीता एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला दिले. बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभागाचे प्रतिनिधी, आरोग्य यंत्रणाचे जिल्हास्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
१,०९,९२५ बालकांना देणार डोज
By admin | Published: January 17, 2016 1:33 AM