गोंदिया : जिल्ह्यातील नक्षलग्रस्त आदिवासी भागातील शालेय मुला-मुलींना डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन, स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राबविलेल्या प्रकल्पामध्ये सहभाग होऊन जगातील सर्वात कमी वजनाचे म्हणजे २५ ग्रॅम ते ८० ग्रॅम वजनाचे उपग्रह यशस्वीरीत्या बनवून प्रक्षेपित करून विश्वविक्रम निर्माण केला आहे. पोलीस दलाच्या पुढाकारामुळे प्रथमच या नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली.
पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त आदिवासी भागातील शालेय मुला-मुलींना उपविभाग देवरी आमगावअंतर्गत १९ जानेवारी रोजी विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी नागपूर येथील सेंट व्हिन्सेंट पलोटी कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग येथे प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या ठिकाणी जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील प्रकाश टेकाम, आशिक टेकाम, रामेश्वर कुंभरे रा. मरुकुटडोह, नरेश टेकाम, सुभाष मडावी रा. दंडारी, ग्यानी धुर्वे, डेव्हिड मरस्कोल्हे, श्रेहर्ष रामटेके, अपूर्वा गणवीर रा. देवरी, तन्मय शहारे रा. मुरदोली या शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी स्वत: उपग्रहाची बांधणी केली. तत्पूर्वी या विद्यार्थ्यांना २ ते ७ जानेवारी दरम्यान याबाबत ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले होते. शालेय जीवनात अंतराळ तंत्रज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण करून भविष्यात अवकाश संशोधन तंत्रज्ञानामध्ये विद्यार्थ्यांचे योगदान वाढावे, यासाठी हा अभिनव प्रयोग राबविण्यात आला. ७ फेब्रुवारी रोजी भारतातील १००० विद्यार्थ्यांनी १०० उपग्रह एकाच वेळी अवकाशात हेलियम बलूनद्वारे प्रक्षेपण करून विश्वविक्रम, आशिया विक्रम, भारतीय विक्रम, असिस्ट वर्ल्ड विक्रम स्थापित केला. यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत झाली आहे. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांनी विश्वविक्रम घडविलेल्या गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
....
महाराष्ट्रातील ३९८ विद्यार्थ्यांचा सहभाग
डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनअतंर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमात महाराष्ट्रातील एकूण ३९८ विद्यार्थी सहभागी झाले होते. यात गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त भागातील १० शालेय विद्यार्थ्यांचासुद्धा सहभाग होता. हे प्रक्षेपण रामेश्वर येथून करण्यात आले.