दोन वर्षांत १५०० विहिरींचे उद्दिष्ट : ६६७ विहिरींचे काम झाले सुरू गोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत जिल्ह्यात सिंचनासाठी सन २०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षांसाठी १५०० विहिरी तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. आतापर्यंत मात्र फक्त १५२ विहिरींचेच म्हणजेच दिलेल्या मूळ उद्दिष्टाच्या १० टक्केच सिंचन विहीरींचे काम पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना सिंचनाची सोय झाली पाहिजे म्हणून शासनाकडून आता मागेल त्याला विहीर अशी योजना राबविली जात आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विहिरी तयार करण्यात येत आहेत. यात जिल्ह्याला १५०० विहीरींचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. सन २०१६-१७ व सन २०१७-१८ अशा दोन वर्षांत जिल्ह्याला ही उद्दीष्ट पूर्ती करावयाची आहे. यात सालेकसा व सडक-अर्जुनी या दोन तालुक्यात प्रत्येकी १५० सिंचन विहिरी तयार करावयाच्या आहेत. तर उर्वरीत सहा तालुक्यांना प्रत्येकी २०० सिंचन विहिरी तयार करायच्या आहेत. या अभियानांतर्गत जिल्ह्यात ६६७ विहिरींचे बांधकाम सुरु करण्यात आले. यातील १५२ विहिरींचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे सुरू करण्यात आलेल्या कामातील ५१५ विहीरींचे काम अद्याप अपूर्ण आहे. यातंर्गत, आमगाव तालुक्यात १५३, अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ८१, देवरी तालुक्यात ११९, गोंदिया तालुक्यात १०१, गोरेगाव १०९, तिरोडा तालुक्यात ८३ सिंचन विहिरींचे काम सुरु करण्यात आले. सालेकसा तालुक्यात १६ तर सडक-अर्जुनी तालुक्यात ५ विहिरींचे काम सुरु आहे. तर आमगाव तालुक्यात १७, अर्जुनी-मोरगाव ४७, देवरी २२, गोंदिया १२, गोरेगाव १६, सडक-अर्जुनी व तिरोडा येथे प्रत्येकी ६ तर सालेकसा तालुक्यात २ विहिरी तयार करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यासाठी ठेवण्यात आलेले सिंचन विहिरींचे उद्दीष्ट फक्त १० टक्के साध्य झाले. तर ९० टक्के विहिरींचे काम शिल्लक आहेत. पुढच्या वर्षात १३४८ विहिरींचे काम होईल का? हा प्रश्नचिन्ह आहे. (तालुका प्रतिनिधी) -५१५ विहिरींचे काम अपूर्ण जिल्ह्यासाठी असलेल्या उद्दीष्टापैकी फक्त १५२ सिंचन विहिरी तयार झाल्या असून ५१५ विहिरींचे काम अपूर्ण आहे. जिल्ह्याला दिलेल्या १५०० विहीरींच्या उद्दीष्टापैकी ७८४ सिंचन विहिरींच्या कामाला सुरूवातच करण्यात आली नाही. ज्या तालुक्यात विहिरींचे काम अपूर्ण आहे त्यात आमगाव तालुक्यातील १४५ विहिरी, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ६६, देवरी तालुक्यातील १०६, गोंदिया ९१, गोरेगाव ९३, सडक-अर्जुनी ४, सालेकसा १६ व तिरोडा ४२ विहिरींचा समावेश आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली मागेल त्याला विहीर देण्याची योजना शासनाने सुरु केली. सुरु करताना गाजावाजा करण्यात आला. परंतु या विहिरींसाठी आलेल्या अर्जांना प्रलंबित ठेवले. काही ठिकाणी काम सुरु केले पण संथगतीने सुरु असलेल्या कामामुळे शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होईल की नाही हे सांगता येत नाही.
१० टक्केच सिंचन विहिरी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2017 1:35 AM