गोंदिया : एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बळजबरीचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी अमितकुमार सत्यनारायण कुशवाह (२५) याला दहा वर्षांचा सश्रम कारावास जलदगती विशेष सत्र न्यायालयाने ठोठावला. हा निर्णय विशेष जलदगती सत्र न्यायालयाने २१ ऑगस्ट रोजी सुनावला आहे.
२४ डिसेंबर २०१४ रोजी दुपारी ३ वाजता आरोपी हा १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या शाळेत जाऊन तुझ्या भावाची प्रकृती बरोबर नाही म्हणून सांगून तिला दवाखान्यात नेले. तिचा भाऊ दवाखान्यात भरती होता. त्याला पाहिल्यानंतर तिला शाळेत सोडून देतो म्हणून तिथून पुन्हा तिला घेऊन तो शाळेत जाण्यासाठी निघाला. परंतु तिला शाळेत न नेता शेडेपार-देवरी मार्गाने नेऊन तिच्यावर जंगल परिसरात बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात देवरी पोलिसात तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने व सहायक पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी केला होता. ९ ऑक्टोबर २०१५ रोजी जिल्हा सत्र न्यायालय येथे आरोपींविरोधात दोषारोप सादर करण्यात आले. या प्रकरणात विशेष सरकारी वकील कृष्णा पारधी यांनी न्यायालयासमोर २१ साक्षीदार तपासले. परिस्थितीजन्य पुरावा तसेच सरकारी पक्षाच्या युक्तिवाद न्यायालयाने एकूण आरोपीला १० वर्षाचा सश्रम कारावास व १३ हजार रुपये दंड ठोठावला आहे. बाललैंगिक अत्याचार अधिनियम २०१२ अंतर्गत कलम ४ अंतर्गत १० वर्षांच्या सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास एक महिन्याच्या अतिरिक्त कारावास, कलम ३५४ अंतर्गत ३ वर्षाचा सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास एक वर्षाचा अतिरिक्त कारावास ठोठावला आहे. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांच्या देखरेखीखाली पैरवी अधिकारी ब्रिजलाल राऊत, महिला पोलीस शिपाई सुनीता लिल्हारे यांनी काम पाहिले.