नरेश रहिले । लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी गाळमुक्त तलाव व गाळमुक्त धरणाची संकल्पना पुढे आणली. परंतु ही संकल्पना स्थलांतरित पक्ष्यांचा अधिवास संपविणारी होती. परंतु एका निसर्ग मित्राच्या लक्षवेधल्यामुळे स्थलांतरीत पक्ष्यांचे अधिवास असलेल्या तलावांना वगळून गाळमुक्त तलावांची संकल्पना राबविली जाणार आहे. तसेच स्थलांतरीत पक्ष्यांच्या अधिवासासाठी आता गोंदिया जिल्ह्यातील ७८ तलावांचे पुनरूज्जीवन केले जाणार आहे. गोंदिया तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आपल्या देशात रशीया, लद्दाक, कजबीस्तान, अफगानीस्तान व आशिया खंडातील ८ ते १० देशातील पक्षी स्थलांतर होत हिवाळ्याच्या दिवसात गोंदिया जिल्ह्यातील तलावांवर येतात. गोंदिया जिल्ह्यातील २२ तलाव स्थलांतरीत पक्षयांना अन्न पुरविणारे आहेत. गोंदिया जिल्ह्यातील या तलावांवर रेडक्रिस्टेड, कॉमन पोचार्ड, ग्रेलेगगुज, कोंबडक, सेलडक, व्हसलींगडक अश्या ५० ते ६० प्रजातीचे परदेशी पाहुणे येतात. परंतु महाराष्ट्र शासनाने सद्या सिंचन क्षमता वाढविण्यासाठी तसेच शेतकऱ्यांची जमीन सुपीक करण्यासाठी गाळमुक्त तलाव व गाळमुक्त धरण ही संकल्पना पुढे आणली. या संकल्पनेमुळे स्थलांतरीत पक्ष्यांचे अधिवासस्थाने नष्ट होऊ शकतात. तलावातील गाळ काढून शेतकऱ्यांच्या शेतात नेली तर त्या तलावातील गाळ बरोबर पाणवनस्पतींची बीजे नष्ट होतील. परिणामी जिल्ह्यात येणाऱ्या परदेशी पाहुण्यांना अन्न मिळणार नाही. त्यामुळे त्यांचा जिल्ह्यातील अधिवास संपेल. ही बाब गोंदियातील निसर्ग मित्र तथा सातपुडा फाऊंडेशनचे संवर्धन अधिकारी मुकूंद धुर्वे यांच्या लक्षात ही बाब आल्याने त्यांनी या प्रकरणाला जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात नेले. ही बाब जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांना देखील पटली. यंदा जिल्ह्यातील ४०० तलावांत गाळमुक्तही संकल्पना राबविली जात असल्याने सद्यस्थितीत गोंदिया जिल्ह्यात स्थलांतरीत पक्ष्यांचे अधिवास असलेल्या २२ तलावांना या गाळमुक्त अभियानातून वगळण्यात आले आहेत. त्या २२ तलावांबरोबर इतर ७८ तलाव या स्थलांतरीत पक्ष्यांचे अधिवासस्थाने कसे होतील यावर भर देऊन त्या तलावांना पुनरज्जीवित केले जाणार आहे. त्या तलावात पाणवनस्पतीची बीजे टाकण्यासाठी स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. तलावांच्या काठांवर देवधान व खसची लागवड स्थलांतरीत पक्ष्यांचे आश्रयस्थान ठरू पाहणाऱ्या तलावातील गाळ काढली जाणार नाही. तसेच त्या तलावात पावसाच्या पाण्याबरोबर येणारी गाळ काठावर थांबविता यावी यासाठी १०० तलावांच्या काठावर देवधान व खस ची लागवड केली जाणार आहे. यामुळे स्थलांतरीत पक्ष्यांचे अधिष्ठाण राखून ठेवण्यासाठीही जिल्हाधिकाऱ्यांचे प्रयत्न दिसून आले. तलावाच्या मधात ‘रेस्टझोन’ पक्ष्यांना मनुष्याचा सहवास नको असते परंतु गोंदिया जिल्ह्यातील व्यक्ती पक्ष्याच्या सहवासात बहुदा गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात असलेल्या सारसांची संख्या कमी झाली आहे. तलावावर आलेल्या पक्ष्यांच्या सहवासात मनुष्य जाऊ नये यासाठी तलावातील मध्यभागी मातीचे बेट तयार करण्यात यावे, जेणेकरून त्या बेटावर पक्षी आराम करतील किंवा त्या पक्ष्यांनी अंडी घातली तरी त्या अंडींना माणसाचा स्पर्श होणार नाही. परिणामी पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ही बाब महतवची ठरेल असे धुर्वे यांनी सांगितले.
स्थलांतरित पक्ष्यांसाठी १०० तलाव
By admin | Published: June 08, 2017 2:01 AM