लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी व कुशल, अनुभवी डॉक्टर घडावे या उद्देशाने २०१५ मध्ये गोंदिया येथील आरोग्य विभागाच्या रुग्णालयाला मेडिकलचे स्वरूप देण्यात आले. परंतु गेल्या पाच वर्षांत गोंदिया मेडिकलमध्ये आवश्यक पायाभूत सोयींपासून ते मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यास वैद्यकीय शिक्षण विभाग कमी पडला. विशेष म्हणजे, २०१६-१७ मध्ये सचिवांनी विकासकामांचे हमीपत्र दिले.त्यानंतरही हा विकास कागदापुरताच राहिला. गेल्या वर्षी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) केलेल्या पाहणीत २९ त्रुटी काढल्या. याचा ‘ई-मेल’ गोंदिया मेडिकलला सोमवारी प्राप्त झाला. यात एमबीबीएसच्या १०० जागांवर प्रवेश का थांबविण्यात येऊ नये, असा प्रश्न विचारण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.गोंदिया मेडिकल कॉलेजची शासनाने सात वर्षांपूर्वी घोषणा केली होती. घोषणेनंतर २०१५ मध्ये आरोग्य विभागाच्या के.टी.एस. सामान्य रुग्णालयात बाह्यरुग्ण, आंतररुग्ण विभाग, वॉर्ड, शस्त्रक्रिया गृह व अतिदक्षता विभाग तर बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालयाला सुरूवात झाली. २०१६ मध्ये एमबीबीएसच्या १०० जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. तेव्हापासून आतापर्यंत या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदियाचा केवळ नावापुरताच विकास झाला. एमबीबीएसच्या जागेला घेऊन दरवर्षी करीत असलेल्या ‘एमसीआय’ पथकासमोर नागपूरच्या मेयो, मेडिकलची उसनवारीवर वैद्यकीय शिक्षक दाखविण्याची परंपरा गेल्यावर्षीही कायम होती. दरवर्षी काढण्यात येत असलेल्या त्रुटींवर शासन गंभीर नसल्याचे पाहत ‘एमसीआय’ने २०१६-१७चे एमबीबीएसच्या १०० जागांचे प्रवेश रोखून धरले. यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांना विकासकामांचे हमीपत्र द्यावे लागले. परंतु त्यानंतरही विकासकामे रखडलेलीच आहेत. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी ‘एमबीबीएस’च्या ५० जागा वाढून १५० जागा झाल्या आहेत. यामुळे आणखी गोंधळ उडाला आहे. गोंदिया मेडिकल बंद हाते की काय, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
एमसीआयने काढल्या या त्रुटी२०.७५ टक्के मनुष्यबळाची कमी, ४६.७७ टक्के निवासी डॉक्टरांची कमी, ओपीडीत कमी रुग्णांची संख्या, केवळ ८०० स्क्वेअर फुटाचीच लायब्ररी, परीक्षा हॉल, लेक्चर्स हॉल, निवासी डॉक्टरांचे वसतिगृह व वैद्यकीय शिक्षकांच्या क्वॉर्टरचा अभाव, पुरुष-महिलांसाठी इन्जेक्शन व ड्रेसिंग रूमची स्वतंत्र नसलेली सोय, रुग्णालयात ९२ खाटांची कमतरता, सीटी स्कॅनचा अभाव अशा २९ त्रुटी काढल्या आहेत.