लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : अवैध दारू विक्रेत्यांविरोधात पोलीस कंबर कसून तयार आहेत व यातूनच दारू विक्रेत्यांवर सातत्याने धाडसत्र सुरू आहे. अशातच होळीचा सण बघून मोठ्या दारू काढण्याच्या तयारीत असलेल्या ६ दारू विक्रेत्यांना पोलिसांनी दणका दिला आहे. बुधवारी (दि. ९) सकाळी ७ वाजता शहरातील संत रविदास वॉर्ड येथे पोलिसांनी धाडी टाकून अवैध दारू विक्रेत्यांकडून तब्बल १० लाख ३५ हजार ८७० रुपयांचा माल जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी, दिलीप घनश्याम बरेकर (३७) याच्या दारू अड्ड्यावर धाड टाकून ७३ हजार रुपये किमतीची ३६५ लिटर मोहादारू, तीन लाख चार हजार रुपये किमतीचा ९५ प्लास्टिक चुंगडीत ३८०० किलो मोहा सडवा, नऊ हजार २७० रुपये किमतीचे हातभट्टी लावण्याचे साहित्य, असा एकूण तीन लाख ८६ हजार २७० रुपयांचा माल जप्त केला. शांता बाबुराव बरेकर (५८) हिच्या दारू अड्ड्यातून एक लाख ८५ हजार ६०० रुपये किमतीचा ५८ प्लास्टिक चुंगडीत २३२० किलो सडवा, शीला विनोद खरोले (४०) हिच्या दारू अड्ड्यातून एक लाख ९८ हजार ४०० रुपये किमतीचा ६२ प्लास्टिक चुंगडीत २४८० किलो सडवा, कविता सेवकराम तांडेकर (४५) हिच्या दारू अड्ड्यातून ८६ हजार रुपये किमतीचा २८ प्लास्टिक चुंगडीत १०८० किलो सडवा, साबीर रहीम पठाण (५२) याच्या दारू अड्ड्यातून एक लाख आठ हजार ४०९ रुपये किमतीचा ३४ प्लास्टिक चुंगडीत १३६० किलो सडवा तसेच तोसीफ सलीम पठाण (३०) याच्या दारू अड्ड्यातून ७० हजार ४०० रुपये किमतीचा २२ प्लास्टिक चुंगडीत ८८० किलो सडवा, असा एकूण १० लाख ३५ हजार ८७० रुपये किमतीचा माल जप्त केला आहे. या आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार योगेश पारधी, हवालदार भाटिया, नायक पोलीस शिपाई वाढे, दमाहे, सपाटे, चालक शेख आणि १५ होमगार्ड सैनिकांनी केली.
सातत्याने सुरू राहणार कारवाया - अवैध दारू विक्रेत्यांविरोधात पोलिसांकडून सातत्याने कारवाया सुरू आहेत. यातून पोलिसांनी त्यांचा मोठ्या प्रमाणात माल जप्त केला आहे. मात्र यानंतरही अवैध दारू विक्रेता एवढ्या मोठ्या प्रमाणात मोहा कोठून आणतात हे समजण्यापलिकडे आहे. त्यात आता होळी जवळ आली असून त्यासाठी अवैध दारू विक्रेत्यांनी तयारी सुरू केली आहे. अशात आता सातत्याने कारवाया सुरू राहणार असून कुणालाही माहिती मिळाल्यास त्याने माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.