गोंदिया : बिरसी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या १०६ कुटुंबांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण होऊन लवकरच त्यांना बिरसी विमान प्राधिकरणाद्वारे घरे देण्यात येणार असल्याचे खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध समस्यांना घेऊन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या १०६ कुटुंबांच्या पुनर्वसनाचा विषय प्रामुख्याने उपस्थित करण्यात आला. हा विषय लवकरच मार्गी लागणार असून त्यासाठी आवश्यक कारवाई पूर्ण केली जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. या पुनर्वसनाच्या कामात कोणताही विलंब केला जाऊ नये असे निर्देशही खासदारांनी दिले. बिरसी येथील सुरक्षा रक्षकांच्या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येणार आहे. हा विषय ही लवकरच मार्गी लागणार असल्याचे ते म्हणाले. देशाच्या फाळणीनंतर स्थलांतरित सिंधी समाजातील लोकांना गोंदिया येथे शासनाकडून वसविण्यात आले होते. परंतु त्यांना जागेचे अधिकार देण्यात आले नव्हते. या संदर्भात खासदार मेंढे यांनी उपविभागीय अधिकारी व भूमिलेख अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या लोकांना पट्टे देण्याचा विषय लवकरात लवकर निर्णयी काढण्यात यावा, अशा सूचना खासदारांनी यावेळी केल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः या विषयात लक्ष घालावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासन काम करीत आहे. प्रतिबंधात्मक लस देण्याचा कार्यक्रम जिल्ह्यात सुरू आहे. जिल्ह्यातील ५३ ठिकाणी लसीकरण मोहीम सुरू आहे. नागरिकांनी भीती न बाळगता स्वतःला लस टोचून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. कोरोनाबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. आरोग्य विभागात वाहन चालक असलेल्यांच्या मानधनाचा विषय मार्गी लावावा, धान खरेदी केंद्रावरील अनियमितता दूर व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे अशा सूचनाही त्यांनी केल्या. घरकुलासाठी ५ ब्रास रेती देण्याच्या संदर्भात कारवाई करण्याचे निर्देशही खासदारांनी यावेळी दिले.
यावेळी बैठकीला जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कुलकर्णी, राजेश खवले, निवासी जिल्हाधिकारी जयराम देशपांडे, नियोजन अधिकारी कावेरी नाखले, जिल्हा आरोग्य अधिकारी नितीन कापसे, कुलराज सिंग, उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते, विनय ताम्रकार, गजेंद्र फुंडे, युवा मोर्चा अध्यक्ष ओम कटरे, भाजप जिल्हा सचिव गुड्डू कारडा, राजेश चतुर, पप्पूराज जनबंधू, लिधिराम पारधी, अशोक जयसिंघानिया आदी उपस्थित होते.