गोंदिया : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा यंदा रद्द करण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी भरलेले शुल्क परत करणार की काय करणार, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यातील इयत्ता दहावीच्या २२ हजार ५२२ विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्कापोटी ४३५ रुपयांप्रमाणे एकूण ९३ लाख ४६ हजार रुपये भरले. मात्र, शिक्षण मंडळाने यंदा कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परीक्षाच घेण्यात येणार नसल्याने विद्यार्थ्यांनी भरलेले परीक्षा शुल्क परत मिळावे, अशी मागणी आता पालकांकडून होऊ लागली आहे. प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांचा मुद्रण खर्च, विद्यार्थ्यांना दिले जाणारे साहित्य, पर्यवेक्षकांचे मानधन, भरारी पथकाचा खर्च आदी खर्च शिक्षण मंडळाला करावा लागतो. मात्र, यंदा परीक्षाच रद्द झाल्याने हा सर्व खर्च झालेला नाही. शिक्षण मंडळाने प्रत्येक विद्यार्थ्याकडून प्रात्यक्षिक, लेखी परीक्षा प्रमाणपत्र शुल्काची आकारणी केली. हे शुल्क विद्यार्थ्यांनी ऑक्टाेबर २०२० मध्येच भरले. काही शाळांनी परीक्षा खर्चाकरिता दोनशे रुपये अतिरिक्त आकारले होते. आता सुद्धा परीक्षा रद्द झाल्याने पैसे परत करण्याची मागणी होत आहे.
.........
पुढे काय होणार?, विद्यार्थी संभ्रमात
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सुरुवातीला दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे मी परीक्षेची पूर्ण तयारी केली होती; पण ऐनवेळी परीक्षा रद्द करण्यात आली. आता पुढे काय, याबाबत संभ्रम कायम आहे.
- विनोद मंडलवार, विद्यार्थी.
......
दरवर्षीसारखीच यावर्षीसुद्धा मार्चमध्ये परीक्षा होणार, या दृष्टीने अभ्यास पूर्ण केला होता. मात्र, शासनाने परीक्षा रद्द केली असून, अकरावीत प्रवेश कसा मिळणार याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे मी आणि माझे पालकसुद्धा गोंधळात आहोत.
- पवन भाेयर, विद्यार्थी.
.........
शासनाने दहावीची परीक्षा तर रद्द केली; मात्र आपण पास झालो की नाही, किती टक्के मार्क्स मिळाले हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे अकरावीत कुठल्या आधारावर प्रवेश मिळणार, याबाबत संभ्रम कायम आहे.
- कान्हा गुप्ता, विद्यार्थी.
............
कोट
शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले परीक्षा शुल्क परत करण्यासंदर्भात शिक्षण विभागाला अद्याप कुठल्याच सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. सूचना प्राप्त होताच पुढील कार्यवाही केली जाईल.
- राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी.
..............
जिल्ह्यातील एकूण माध्यमिक शाळा - २६२
प्रति विद्यार्थी परीक्षा : ४३५
दहावीतील एकूण विद्यार्थी : २२,५२२
परीक्षा शुल्काची एकूण रक्कम : ९३ लाख ४६ हजार
............