नरेश रहिले
गोंदिया : जिल्हा आदिवासी व नक्षलग्रस्त असून गोंदिया जिल्ह्यातील महिलांची गर्भावस्थेत काळजी घेतली जात नाही. परिणामी कुपोषणाचे प्रमाण वाढते. गर्भावस्थेत बाळांचा मृत्यू होतो. एकट्या बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात सन २०२० या वर्षाच्या जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यात २६२ बाळांचा मृत्यू झाला आहे.
गोंदिया जिल्ह्यात आठ तालुक्यांसाठी ४० प्राथमिक आरोग्य केंद्र, नऊ ग्रामीण रुग्णालय व एक महिला रुग्णालय गर्भवतींच्या सोयींसाठी उभारण्यात आले आहेत. गर्भावस्थेत महिलांची योग्य काळजी घेतली नसल्याने गर्भातच शेकडो बाळ मृत्यू पावत असल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यात पुढे आला आहे. गोंदिया जिल्ह्यात एकमेव स्त्री रुग्णालय बाई गंगाबाई असल्याने या रुग्णालयावर संपूर्ण जिल्ह्याचा भार असतो. सोबत मध्य प्रदेशची सीमा जवळच असल्याने तेथील रुग्णही गंगाबाई रुग्णालयात येतात. वर्षाकाठी बाई गंगाबाई रुग्णालयात शस्त्रक्रिया व सामान्य प्रसूती मिळून सात हजाराच्या घरात प्रसूती केल्या जातात. यातील दरवर्षी ३०० बालके दगावतात. आईच्या गर्भातच ११ महिन्यात १३१ (आययूडी) बालके दगावल्याची माहिती पुढे आली. १५ बालकांची पोटात वाढ झाली नाही (स्टील बर्थ), जन्माला आलेले आणि ज्यांच्यावर बालरोग विभागात उपचार सुरू होते अशी मृत्यू पावणाऱ्या बालकांची संख्या १३ आहे. पाच नवजात बालकांचा समावेश आहे. गंगाबाईत नवजात बालकांसाठी तयार करण्यात आलेल्या नवजात अतिदक्षता कक्षात उपचार घेणाऱ्या ९८ बालकांचा मृत्यू झाला आहे. बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात ११ महिन्याची परिस्थिती पाहता २६२ बालक प्राणास मुकले.
बॉक्स
बाळंतपणात होतोय हलगर्जीपणा
बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात जिल्हाभरात आलेल्या बाळंतीणीचा उपचार केल्यानंतर आलेल्या वास्तविकतेमुळे १३१ बालके ही आईच्या पोटातच दगावली. १५ बालकांची आईच्या पोटातच वाढ झाली नाही. गर्भावस्थेत महिलांची काळजी घेतली जात नसल्याने, गर्भवतींना सकस आहार दिला जात नसल्याने पोटातील बाळाची वाढ होत नाही. जन्माला आलेले बाळ व्यंगत्व घेऊन जन्माला येते. काही बाळ कुपोषित असतात तर काहींचा जन्मापूर्वीच मृत्यू होतो. बाळंतीणींची काळजी घेण्यासाठी घरच्यांनी तत्परता दाखविणे गरजेचे आहे.