गोंदिया : शहरातील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम गोंदिया जिल्हा व पोलिस विभाग गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखू नियंत्रण कायदा २००३ अंतर्गत कारवाई करीत तंबाखू खाणाऱ्या ११ जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई ३ मे रोजी करण्यात आली आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे यांच्या मार्गदर्शनात रुग्णालयाच्या परिसरात तंबाखू खाणारे व बाळगणारे यांच्यावर धाडसत्र राबवून दंडात्मक कारवाई करण्यात आली. ११ जण तंबाखू खाताना आढळले. त्यांच्यावर कोटपा कायदा २००३ च्या कलम ४ नुसार दंडात्मक कारवाई करून ११५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या धाडसत्रात आरोग्य विभागातर्फे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा सल्लागार डॉ. अनिल आटे, मनोवैज्ञानिक सुरेखा आझाद मेश्राम, सामाजिक कार्यकर्ता संध्या शंभरकर, विवेकानंद कोरे, पोलिस विभागातर्फे पोलिस हवालदार आनंद धुवारे, पोलिस शिपाई निर्वाण व पाटील यांनी केली आहे.