संजय गांधी-श्रावणबाळ योजना : फक्त १२९ प्रस्ताव प्रलंबित गोंदिया : गरजूंना मदतीचा हात म्हणून आर्थिक मदत करणारी संजय गांधी व श्रावणबाळ योजना वरदान ठरत आहे. योजनेंतर्गत तालुक्यात ११ हजार २२ लाभार्थ्यांना आर्थिक मदत दिली जात आहे. तर फक्त १२९ प्रस्ताव प्रलंबीत असल्याची माहिती आहे. तोकडी का असो ना मात्र योजनेतून काही तरी मदत पुरविण्याचे कार्य शासनाकडून केले जात आहे. निराधारांसह गरजूंना आर्थिक मदत करता यावी या उद्देशातून शासनाने संजय गांधी व श्रावणबाळ योजना सुरू केली आहे. यातील संजय गांधी निराधार योजनेंतर्गत ६४ वर्षापर्यंतच्या विधवा, अपंग, अनाथ, दुर्धर आजाराने ग्रस्त, परित्यक्ता व घटस्फोटीतांना मदत दिली जाते. तर श्रावणबाळ योजनेंतर्गत ६५ वर्षानंतरच्या वृद्ध व अपंगांना या योजनेतून आर्थिक मदत दिली जाते. यासाठी तालुकास्तरावर संबंधीतांकडून प्रस्ताव मागवून यासाठी असलेल्या समितीच्या माध्यमातून प्रस्तावांना मंजूरी दिली जाते. यासाठी गठीत समितीची तीन महिन्यांतून एकदा सभा होत असल्याची माहिती असून त्यातूनच प्रस्तावांना मंजूरी दिली जात असल्याची प्रक्रीया आहे. या दोन्ही योजनांतर्गत तालुक्यात ११ हजार २२ लाभार्थ्यांना शासनाकडून आर्थिक मदत दिली जात आहे. यात संजय गांधी योजनेंतर्गत ५३३१ तर श्रावणबाळ योजनेंतर्गत ५६९१ लाभार्थी लाभ घेत आहेत. येथे शहर व ग्रामीण क्षेत्र बघावयाचे झाल्यास शहरी क्षेत्रात संजय गांधी योजनेचे १७६७ व श्रावणबाळ योजनेचे ११४४ लाभार्थी आहेत. तर ग्रामीण क्षेत्रात संजय गांधी योजनेचे ३४६५ व श्रावणबाळ योजनेचे ४५४७ लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना दरमहा ६०० रूपयांची आर्थिक मदत दिली जात असून थेट त्यांच्या खात्यात जमा केली जाते. विशेष म्हणजे बीपीएल लाभार्थ्यांना ४०० रूपये राज्य तर २०० रूपये केंद्र शासनाकडून दिले जातात. (शहर प्रतिनिधी) अनुदानात वाढ करा मदतीचा हात म्हणून शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या या योजना वाखाणण्याजोग्या आहेत. मात्र आजघडीला महागाई बघता ६०० रूपयांत संबंधीत लाभार्थ्यांना एक वेळचे जेवण किंवा आवश्यक ती गरज भागविणे शक्य नाही. अशात शासनाकडून दिले जाणारे हे अनुदान एक थट्टाच वाटते. अन्यत्र वारेमाप खर्च करीत असतानाच शासनाकडून या निराधार व गरजूंसाठी थोडा हात सैल करण्याची गरज असल्याचेही लाभार्थ्यांकडून अपेक्षीत आहे.
११ हजार गरजूंना मदतीचा हात
By admin | Published: August 13, 2016 12:10 AM