दोन वर्षांपासून वेतन नाही : देवरी प्रकल्प कार्यालयावर आत्मदहन लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : आदिवासी आश्रम शाळामध्ये काम करणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांना संस्था बंद झाल्यामुळे मागील दोन वर्षापासून त्यांचे समायोजन झाले नाही. परिणामी आर्थिक अडचणीत असलेल्या ११ कर्मचाऱ्यांनी देवरी येथील प्रकल्प अधिकारी कार्यालयावर १ जून रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. अनुसूचित जमाती आश्रम शाळा सडक-अर्जुनी, पांढराबोडी व दोडके जांभळी येथील मान्यता रद्द झाल्याने या शाळांतील कर्मचारी मागील दोन वर्षापासून समायोजनेच्या प्रतिक्षेत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या मुलामुलीचे वय वाढत असल्याने त्यांचे शिक्षण, मुला-मुलीचे लग्न, दैनंदीन गरजा पूर्ण करण्यासाठी कर्मचारी आर्थिक संकटात सापडला आहे. शाळा बंद झाल्याने या कर्मचाऱ्यांना यातना भोगाव्या लागत आहे. मागील दोन वर्षापासून आर्थिक संकटाचा सामना करताना त्यांच्या नाकी नऊ आले आहे. शाळा बंद झाल्या त्यात आमचा काय दोष असा सवाल ते करीत आहेत. समायोजन करण्यात यावे यासाठी उपोषण, आंदोलन केले. परंतु दोन वर्षापासून न्याय न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी १ जून रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. ३१ मे पर्यंत सामावून न घेतल्यास १ जून रोजी देवरीच्या प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा एम.डब्ल्यू. चाचेरे, जी.बी.कुळकर्णी, डी.एस.पडोती, ए.टी.शहारे, एन.पी.मेश्राम, एन.एम.बावणे, पी.जी.कस्पार, एम.एच.वानखेडे, एम.डी.टेकाम, आर.एम.कुंभरे, जी.एन.चुटे यांनी दिला आहे.
११ कर्मचाऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा
By admin | Published: May 28, 2017 12:03 AM