गोंदिया : नक्षलग्रस्त भागातील सुशिक्षित तरूण-तरूणी व इतर नागरिकांनी नक्षलवाद्यांच्या भुलथापांना बळी न पडता, रोजगाराच्या या संधीचा फायदा घेता यावा यासाठी नक्षलग्रस्त भागातील तरूण-तरूणींसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन पोलिसांनी केले होते. या रोजगार मेळाव्यात १,१८२ सुशिक्षित बेरोजगार तरूण-तरूणींनी भाग घेतला होता.
पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून जिल्हा पोलीस दलातर्फे मंगळवारी (दि.१६) देवरी, बुधवारी (दि.१७) नवेगावबांध तर गुरूवारी (दि.१८) सालेकसा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात यशस्वी ग्रुप ऑफ कंपनी प्रा. लि. (पुणे), पटेल एज्युकेशन स्कील फाउंडेशन (नागपूर),मर्ज वर्क फोर्स (नागपूर), डेक्कन मॅनेजमेंट कन्सल्टन्टस् फिनिसिंग स्कूल, स्कील फाउंडेशन (पुणे) या कंपन्यांचे प्रतिनिधी मुलाखत करिता आमंत्रित करण्यात आले होते. या मेळाव्यात आलेल्या तरूण-तरूणींनी मुलाखत देऊन आपला बायोडाटा कंपनीच्या प्रतिनिधींना सादर केला. त्यांना विविध कंपनीमध्ये शैक्षणिक योग्यतेनुसार रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
याप्रसंगी कुलकर्णी यांनी युवकांना मार्गदर्शन केले. मेळाव्यासाठी नक्षल सेल गोंदिया-देवरी, पोलीस ठाणे देवरी, पोलीस ठाणे नवेगावबांध, पोलीस ठाणे सालेकसाचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. नक्षलग्रस्त भागातील सुशिक्षित तरूण-तरूणी व इतर नागरिकांनी नक्षलवाद्यांच्या भुलथापांना बळी न पडता अशा रोजगाराच्या या संधीचा फायदा घेऊन आपले जीवन सुकर करावे व शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे पोलीस अधीक्षक पानसरे यांनी कळविले आहे.