१० पर्यंत पोलीस कोठडी : बारावा आरोपी केवळराम नंदेश्वर फरारच अर्जुनी मोरगाव : दि गोंदिया डिस्ट्रीक्ट सेंट्रल को-आॅप बँकेच्या अफरातफर प्रकरणी आणखी एक म्हणजेच ११ व्या आरोपीस पोलिसानी अटक केली आहे. न्यायालयाने त्या आरोपीला १० जानेवारी पर्यंत पोलीलस कोठडी सुनावली आहे. स्थानिक मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत १६ फेब्रुवारी २०१२ रोजी १ कोटी ९४ लाख रुपयाची अफरातफर उघडकीस आली होती. खोटा हिशेब व बनावट दस्तावेज तयार करुन अफरातफर केल्याप्रकरणी त्यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात दिलीप तुळशीराम गायधने (४३), भूमेश्वर काशीराम चामलाटे (३०), विनोद यशवंत नाकाडे (३२), खेमराज उर्फ बंडू सोनवाने (३४), सुनील पंढरी देशमुख (३३), शैलेश धिरेंद्रसिंह बडगुजर (३४), देवीदास बाजीराव हेमणे (३५) व संदीप रतीराम कापगते (३२) या आठ आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरुद्ध गुन्हा न्यायप्रविष्ठ आहे. सन २००६ ते २०११ या कालावधीत अफरातफर झाल्याने फेर लेखा परिक्षण करण्यात आले. सहकारी संस्था (साखर) नागपूरचे विशेष लेखा परीक्षक एम.एस. आटे यांनी ३० नोव्हेंबर २०१६ रोजी अहवाल सादर केला. यावरुन गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रामचंद्रम चंपालाल त्रिवेदी यांनी ५ जानेवारी २०१७ रोजी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. लेखा परीक्षणाच्या अहवालात अफरातफरीची राशी १० कोटी ८९ लाख ९७ हजार ३६६ रुपये असल्याचे समजते. याप्रकरणी ७ जानेवारी रोजी जितेंद्र शामराव धरमशहारे (४०) देवरी तसेच तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय भालचंद्र पाटील (६६) भंडारा यांना समावेश आहे. या प्रकरणातील बारावा आरोपी केवळराम भरत नंदेश्वर अद्याप फरारच आहे. आरोपीविरूध्द अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४०९, ४१८, ४२०, ४६८, ४७१, ४७७ (अ), ४११, ४१३, १०९, ११४, १२० (ब), ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल आहे. सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक पराग भट, हवालदार मुकेश थेर यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
अर्जुनी बँकेतील अपहारप्रकरणी ११ व्या आरोपीस अटक
By admin | Published: January 10, 2017 12:19 AM