नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मनुष्याला आधार क्रमांक देऊन त्यांना विशेष ओळख देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर जनावरांची ओळख करण्यासाठी शासनाने पशूसंजीवनी योजनेंतर्गत दुधाळू जनावरांना युनिक कोड देण्याची योजना सुरू केली आहे. ही मोहीम आता सुरू झाली असून जिल्ह्यातील सर्व दुधाळू जनावरांना हे युनिक कोड दिले जाणार आहेत.गोंदिया जिल्ह्यात एक लाख २२ हजार दुधाळू जनावरे आहेत. त्या जनावरासंदर्भात सर्वच माहिती ‘ई-हट’ या पोर्टलवर टाकली जाणार आहे. १२ अंकी असलेला युनिक कोडचा टॅग प्रत्येक दुधाळू जनावरांना दिला जाणार आहे. गोंदिया जिल्ह्यात पहिल्या टप्यात २५ हजार जनावरांना हे टॅग लावले जाणार असून हे टॅग जिल्ह्याला मिळाले आहेत. या मोहीमेची प्रचार-प्रसिध्दी जोमाने सुरू आहे. पहिल्या टप्यात दुधाळू गायी, म्हशींना टॅग लावून संगणकाद्वारे जनावर व पशूपालकांची माहिती अपलोड करणे सुरू आहे. आता पर्यंत गोंदिया जिल्ह्यातील २७३ जनावरांना हे युनिक कोड देण्यात आले आहेत.नोंदणी झालेल्या जनावरांचे प्रजनन, पोषण, लसीकरण, अनुवांशिक सुधारणा व इतर किरकोळ सेवा ज्या जनावरांना दिल्या जात आहे त्याची नोंदणी पोर्टलवर करावी लागेल. हे युनिक कोड जनावरांना लावण्यासाठी जिल्ह्यातील पशू संवर्धन विभागातील सर्व अधिकारी व पशूधन पर्यवेक्षकांना उद्दिष्ट देण्यात आले आहे.दररोज एक व्यक्ती कमीत-कमी पाच जनावरांना टॅग लावेल असा नियम विभागाकडून घालून देण्यात आला आहे. जनावरांना फक्त टॅग लावूनच चालणार नाही तर त्या संबंधात पशूपालकाला सर्व माहिती दिल्यानंतरच टॅग लावले जात असल्याची माहिती जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी डॉ. राजेश वासनिक यांनी दिली आहे.जिल्ह्यात कशाप्रकारची जनावरे आहेत, सर्वात जास्त दूध देणारी गाय किंवा म्हस किती लीटर दूध देते याची माहिती त्या युनिक कोडच्या आधारावर वेबसाईटवर उपलब्ध राहणार असल्याने जगाच्या पाठीवरील कुठलाही व्यक्ती जिल्ह्याच्या दुधाळू जनावरांची माहिती एका क्लीकवर मिळवू शकेल.प्रत्येक पशूपालकांना पशूसंजीवनी ही योजना लाभदायी ठरेल. जिल्ह्यातील जनावरांची राष्टÑीय स्तरावर युनिक ओळख कायम राहील. जिल्ह्यातील पशूंना तांत्रीक सेवा राष्टÑीय पातळीवर डाटाबेस मध्ये सुरक्षीत राहील. पशू संवर्धन खात्यातील भविष्याचे नियोजन व सेवा या दृष्टीने करणे सुलभ होईल. पशू पालकांनी दुधाळू जनावरांना पहिल्याच टप्यात विशीष्ट क्रमांकाचा बिल्ला लावून घ्यावा.-डॉ. राजेश वासनिकजिल्हा पशूसंवर्धन अधिकारी, जि.प.गोंदिया.
१.२२ लाख दुधाळू जनावरांना ‘युनिक कोड’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 12:00 AM