प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र : १३ मे पर्यंत तपासणी लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. प्रगत महाराष्ट्रातील पहिला जिल्हा म्हणून जिल्ह्याला नावारूपास आणण्यासाठी शर्थीने प्रयत्न करण्यात येत आहेत. या उपक्रमापूर्वी जिल्हा परिषदेने ‘गावची शाळा-आमची शाळा’ हा उपक्रम सुरू केला होता. त्या उपक्रमाला प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाची जोड दिली. त्या शाळांचे मूल्यमापन करून जिल्ह्यातील केंद्रस्तरापासून जिल्हास्तरापर्यंतच्या १२३ शाळांना पुरस्कार दिला जाणार आहे. बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला दर्जेदार व गुणवत्तायुक्त शिक्षण देणे ही राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्था यांची जबाबदारी आहे. अध्ययन संपादणूक सर्वेक्षणाच्या अहवालानुसार अपेक्षित अध्ययन निष्पत्ती प्राप्त न झाल्याचे शासनाच्या लक्षात आल्याने राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने २२ जून २०१५ रोजी एक शासन निर्णय काढून शिक्षण क्षेत्रात क्रांतीकारी बदल घडवून आणण्याचा मानस बांधला आहे. या उपक्रमाला कृतीत उतरवून राज्यात प्रगत शिक्षणात गोंदिया जिल्हा प्रथम असावा यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग काम करीत आहे. शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना प्रगत करण्याचा मानस बांधला. प्रत्येक बालक ज्ञानरचनावादी पध्दतीने शिक्षण घेत लेखन, वाचन व गणित क्रिया प्राप्त करणे आवश्यक आहे. बालकांचा बहुमुखी विकास करण्यासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये अनेकांगी बदल करण्यात आले आहे. ६ ते १४ वयातील बालकांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, १०० टक्के विद्यार्थी प्रगत करणे, प्रत्येक शाळेला स्वच्छ व सुंदर परिसर उपलब्ध करून देणे, शाळेत लोकसहभाग वाढविण्यावर भर, शिक्षकांची गुणवत्ता व कल्पकतेला वाव, शाळेत शैक्षणिक साहित्यावर भर, अप्रगत मुलविहीन शाळा करणे, विद्यार्थ्यांच्या स्वयंअध्यनावर भर, कृतीद्वारे शिक्षण देणे, विद्यार्थ्यांची कठीण विषयांविषयी आवड निर्माण करणे, शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांच्या मनातील भीती नाहीसी करणे, शाळा सुंदर, विद्यार्थ्यांची शाळेविषयी आवड निर्माण करणे, सोप्या व सुलभ पध्दतीने ज्ञानार्जन करून विद्यार्थ्यांच्या संपादणूक क्षमतेत वाढ करणे, सर्वांगिण विकास करणे व विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचे काम या उपक्रमातून केले जात आहेत. असे आहेत पुरस्कार केंद्रस्तरावरील ८५ शाळा असून प्राथमिक विभागाच्या केंद्रातून प्रथम येणाऱ्या शाळांना चार हजार तर उच्च प्राथमिक विभागातून प्रथम येणाऱ्या शाळांना सहा हजार, तालुका स्तरावर प्राथमिक व उच्च प्राथमिक गटासाठी प्रथम १० हजार व द्वितीय सात हजार पुरस्कार, जिल्हास्तरावर प्राथमिक व उच्च प्राथमिक गटासाठी प्रथम ७१ हजार व द्वितीय ५१ हजार तर तृतीय ३१ हजार रूपये पुरस्कार तर प्राथमिक व उच्च प्राथमिक गटासाठी प्रत्येकी दोन पुरस्कार त्यात २१ हजार व ११ हजार प्रोत्साहनपर पुरस्कार आहेत.
१२३ शाळांना मिळणार पुरस्कार
By admin | Published: May 13, 2017 1:33 AM