तीन गावांचे आरोग्य धोक्यात : दिलीप बन्सोड यांचा आंदोलनाचा इशारा लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : तिरोडा शहरात एकीकडे झुडपी जंगलाच्या नावाखाली शासन गरिबांच्या घरकुलांना मंजुरी देत नाही तर दुसरीकडे अदानी पॉवरला मेंदिपूर, भिवापूर व बरबसपुरा या तीन गावांच्या मधातील झुडपी जंगलाची जागा देण्यास केंद्र शासनाने तत्वत: मंजूरी दिली आहे. त्यामुळे सदर तिन्ही गावांतील नागरिकांचे आरोग्यच धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र शासनाने ही मंजुरी दिलीच कशी? असा सवाल माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी उपस्थित करून आंदोलनाचा इशारा दिला आहे. माजी आ. दिलीप बन्सोड यांनी गोंदियाचे विभागीय वनाधिकारी यांच्याशी चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, तिरोडा तालुक्यातील मेंदिपूर, भिवापूर व बरबसपुरा या तिन्ही गावांच्या मधातील १२५ हेक्टरची वनजमीन अदानी पॉवरला यास पाँडसाठी देण्यात आली आहे. याला केंद्र शासनाने तत्वत: मंजुरीसुद्धा दिल्याचे विभागीय वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र याबाबत संबंधित ग्रामपंचायतींना कोणतीही सूचना किंवा माहिती देण्यात आली नाही. रात्रभरात गुपचूप कामे उरकून घेतली जात असल्याचा आरोपही माजी आ. दिलीप बन्सोड यांनी केला आहे. आधीच मेंदिपूर गावात अदानीची राख मोठ्या प्रमाणात उडत असल्याने तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून मेंदिपूर गावाचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. मात्र त्याकडे अदानीच्या व्यवस्थापनाचे दुर्लक्ष केले. आता बरबसपुरा व भिवापूर ही दोन्ही गावे पूर्णत: प्रदूषणाच्या विळख्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. १२५ हेक्टर झुडपी जंगलाची जागा अदानी पॉवरला देण्यापूर्वी मेंदिपूर, भिवापूर व बरबसपुरा येथील ग्रामपंचायतींनासुद्धा विचारात घेण्यात आले नाही, असे माजी आमदार बन्सोड यांनी कळविले आहे. अदानी पॉवरकडून कोणतेही नवीन उद्योग आणले जात नाही. बेरोजगार युवकांना रोजगार दिले जात नाही. एकीकडे शासन-प्रशासन खास तिरोडा शहरातील गरिबांच्या साध्या घरकुलांना झुडपी जंगलाची जागा असल्याच्या नावाखाली मंजुरी देत नाही. मात्र अदानी पॉवरला १२५ हेक्टर झुडपी जंगलाची जागा देण्यास तत्वत: मंजुरी देवून मोठाच अन्याय केल्याचा आरोप करीत माजी आ. दिलीप बन्सोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
१२५ हेक्टर झुडपी जंगलाची जागा अदानी पॉवरला
By admin | Published: June 22, 2017 12:10 AM