प्रचारकार्य जोमात : २९ ला मतदान, ३० ला होणार मतमोजणीगोंदिया : शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील रिक्त पदासाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीत १३ मतदान केंद्रांवरून मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. यासाठी प्रभागातील चार शाळांची निवड करण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक मशीनवर मतदान होणार असून यासाठी १३ मशिन्स राहतील. ३० मे रोजी मतमोजणी होणार आहे. विशेष म्हणजे आता दिवस कमी असल्याने प्रभागात प्रचार कार्यही जोमात सुरू आहे. नगरसेवक अनिल पांडे यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या पदासाठी ही पोटनिवडणूक घेतली जात आहे. यापूर्वी एकदा पोटनिवडणूक रद्द करण्यात आल्यानंतर दुसऱ्यांदा ही पोटनिवडणूक घेतली जात आहे. शहरात फक्त एकाच जागेसाठी ही निवडणूक होत असली तरिही शहरवासीयांचे लक्ष या जागेसाठी लागले आहे. त्यामुळे निवडणुकीची जोड-तोडही मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसते. विशेष म्हणजे ही जागा भारतीय जनता पक्षाचे अनिल पांडे यांनी जिंकली होती. पांडे यांच्या मृत्यूमुळे ही पोटनिवडणूक घेण्याची वेळ आली आहे. अशात ही जागा परत मिळविण्यासाठी भारतीय जनता पक्षाची धडपड सुरू आहे. तर ही जागा आपल्याकडे खेचून घेण्यासाठी अन्य पक्षही जोर लावत आहेत. विशेष म्हणजे अपक्ष उमेदवारही रिंगणात असून तेही आपापल्या परीने जोर लावत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीला घेऊन शहरात उत्सुकतेचे वातावरण वाढत चालले आहे. त्यात मतदानासाठी आता पाच दिवस उरले असून २७ तारखेला सायंकाळी ५ वाजता प्रचार बंद पडणार आहे. तर ३० तारखेला हिंदी टाऊन शाळेतील स्वर्ण जयंती कार्यालयात सकाळी १० वाजतापासून मतमोजणी केली जाणार आहे. (शहर प्रतिनिधी)१३,१६७ मतदार हक्क बजावणार या पोटनिवडणुकींतर्गत येत्या २९ तारखेला मतदान होणार असून यात प्रभागातील १३ हजार १६७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. यासाठी प्रभागातील संत तुकाराम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालात ४, जेठाभाई माणिकलाल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ४, सरस्वती महिला विद्यालयात २ व नमाद महाविद्यालयात ३ मतदान केंद्र देण्यात आले आहे. या मतदान केंद्रांवर एक केंद्र अध्यक्ष व तीन सहकारी राहतील. माजी नगरसेवक आमनेसामने या निवडणुकीत एकूण सहा उमेदवार रिंगणातक असून त्यात दोन माजी नगरसेवक आमनेसामने आले आहेत. यात राष्ट्रवादीचे उमेदवार विनायक खैरे तर दुसरे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजू पारधी हे आहेत. याशिवाय उमेश मनोहर दमाहे व नागेश्वर राजेश दुबे हे दोघे अपक्ष उमेदवार असून लोकचंद सोमाजी रहांगडाले कॉंग्रेसकडून, दीपक सुधाकर बोबडे शिवसेनाकडून रिंगणात आहेत.अपक्षांचाही बोलबाला, जाहीर सभा सुरूपोटनिवडणुकीला घेऊन सर्वच उमेदवारांकडून आपापल्या परिने प्रचार केला जात आहे. कुणी सभा तर कुणी घरी जाऊन भेटीगाठीच्या माध्यमातून आपला प्रचार करीत आहेत. मात्र प्रभागात अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले उमेदवारही प्रचारात आघाडी घेत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत अधिकच रंगत आली आहे.
पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी १३ केंद्र
By admin | Published: May 24, 2016 1:49 AM