गोंदिया : नॅशनल मेडिकल कमिशन, न्यू दिल्ली येथे या संस्थेमध्ये १३ विषयांत एमडी, एमएस पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याकरिता प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. लवकरच या प्रस्तावास मान्यता मिळण्याची शक्यता आहे. या संस्थेतील एमबीबीएस १०० विद्यार्थी क्षमतेच्या अभ्यासक्रमाचे नॅशनल मेडिकल कमिशन, न्यू दिल्ली यांच्याकडून निरीक्षण करण्यात आले असून, लवकरच मान्यता मिळेल, असा विश्वास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे यांनी व्यक्त केला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया या संस्थेचा केटीएस सामान्य रुग्णालय येथे पाचवा वर्धापन दिवस रविवारी साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राजेश खवले उपस्थित होते. अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे यांनी २०१६ ते २०२१ या कालावधीची संस्थेच्या प्रगतीची माहिती उपस्थितांना दिली. या संस्थेमध्ये एमबीबीएसची प्रतिवर्ष प्रवेश क्षमता १५० आहे. संस्थेत सीपीएस पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम एकूण चार विषयांत सुरू असून २०२१ पासून बधिरीकरणशास्त्र विभागात चार पदविका अभ्यासक्रमाला मान्यता मिळालेली असून, या संस्थेत लवकरच हा अभ्यासक्रम सुरू होईल. २०१६ प्रथम बॅचचे एमबीबीएस विद्यार्थी अंतिम परीक्षेला बसले होते. ८९ पैकी एकूण ८४ विद्यार्थ्यांनी अंतिम परीक्षा उत्तीर्ण केली व विद्यार्थी आंतरवासिता प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून काम करीत आहेत. मौजा कुडवा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी २५ एकर स्वतंत्र जागेवर बांधकामाकरिता रु. ६८९ कोटींची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून, बांधकाम लवकर सुरू होणार असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. डॉ. प्रवीण जाधव, सहयोगी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले; तसेच त्यांनी संस्थेच्या वाटचालीत मोलाचा वाटा उचलणारे संस्थेचे माजी अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, डॉ. अपूर्व पावडे, डॉ. व्ही. पी. रुखमोडे यांचे आभार मानले.