गोंदिया : दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या निलागोंदी येथील मामाकडे १३ तलवारी भाच्याने लपवून ठेवल्या होत्या. त्या तलवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ५ जुलै रोजी ताब्यात घेतल्या आहेत. यासंदर्भात मामाला अटक करण्यात आल्याची माहिती गोंदिया पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांंनी बुधवारी (दि. ६) पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
गोंदिया जिल्ह्यात अवैध शस्त्र व हत्यारे बाळगणारे व्यक्तीविरुद्ध मोहीम राबविण्यासाठी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी २९ जून रोजी एक पथक तयार केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना ५ जुलै रोजी निलागोंदी येथील खेमलाल बुधुलाल मस्करे यांच्या घरी अवैध तलवारी असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी खेमलाल बुधुलाल मस्करे रा. निलागोंदी याचे राहते घरी छापा टाकला. यावेळी माजघरात एका खाकी रंगाच्या खोक्यात १३ नग तलवारी आढळल्या. खेमलाल मस्करे यांना पोलिसांनी विचारपूस केली असता, या तलवारी त्याच्या भाच्याच्या असल्याचे सांगितले.
खेमलालच्या भाच्याने त्या तलवारी घेऊन आल्याचे सांगितले. १३ तलवारी बाळगणारा भाचा अल्पवयीन आहे. याप्रकरणी खेमलाल मस्करे व त्याच्या भाच्याविरुद्ध दवनीवाडा पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी खेमलाल बुधुलाल मस्करे (५१) रा. निलागोंदी याला अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सुखदेव राऊत करीत आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, महेश विघ्ने, सोमेंद्रसिंग तुरकर, ओमेश्वर मेश्राम, अजय रहांगडाले, संतोष केदार, श्याम राठोड यांनी केली आहे.