गोंदिया : अवैधपणे रेतीचे उत्खनन करून वाहतूक करणारे ८ ट्रॅक्टर, तसेच विनापरवाना मध्य प्रदेशातून विटा घेऊन येत असलेल्या ४ ट्रॅक्टरला एकाच रात्री पकडून तिरोड्याचे उपविभागीय प्रवीण महीरे यांनी रेती-विटा माफियांना सळो की पळो करून सोडले. त्यांच्याकडून जवळपास ८५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. यातील पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या रेतीच्या ६ ट्रॅक्टरचालकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.प्राप्त माहितीनुसार चांगल्या रेतीसाठी प्रसिद्ध असलेल्या तिरोडा तालुक्यातील काही रेतीघाटांचा लिलाव व्हायचा आहे. असे असताना कवलेवाडा रेती घाटामधून अवैधपणे रेतीचे उत्खनन करून मध्यरात्रीच्या सुमारास त्या रेतीची वाहतूक केल्या जात असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी महिरे यांना मिळाली होती. मात्र कारवाईसाठी जाताना रेतीमाफियांना आधीच खबर पोहोचत असल्याचे पाहून त्यांनी शनिवारी रात्री एक खासगी गाडी भाड्याने घेऊन शोधमोहीम सुरू केली. त्यात कवलेवाडा घाटातून रेती नेणारे ८ ट्रॅक्टर त्यांच्या नजरेस पडले. यापैकी दोन ट्रॅक्टर जप्त केले, तर ६ ट्रॅक्टर पळून गेले. मात्र त्यांचा नंबर आधीच घेऊन ठेवल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याशिवाय मध्यप्रदेशातून विनापरवाना विटा घेऊन येणारे ४ ट्रॅक्टर आणि एक मुरूमाचा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. त्यांच्याकडून जप्त मालाच्या पाच पट असा एकूण जवळपास ८५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विटांचा एक ट्रॅक्टर पळून जाण्यात यशस्वी झाला. त्याचा शोध सुरू आहे.ही कारवाई मध्यरात्री १२ पासून पहाटे ५ वाजेपर्यंत कवलेवाडा, चिरेखनी, खैरलांजी, अर्जुनी, चुरडीपर्यंत परिसरात करण्यात आली. एसडिओ महिरे यांनी खासगी गाडीने सिनेस्टाईल केलेल्या या कारवाईमुळे माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
अवैध रेती-विटांची वाहतूक करणारी १३ वाहने पकडली
By admin | Published: January 04, 2016 4:08 AM