गोंदिया जि.प.चा भोंगळ कारभार : त्रस्त शिक्षकांचे संसार उघड्यावर लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : शासनाच्या नियमानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषदांकडून आपसी आंतरजिल्हा बदली करण्यात येत आहे. परंतु या प्रकाराला गोंदिया जिल्हा परिषद अपवाद आहे. मागील तीन वर्षापासून आपसी आंतरजिल्हा बदलीचे १३ प्रस्ताव गोंदिया जिल्हा परिषदेने मंजूर केले नाही. त्यामुळे या शिक्षकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शासनाच्या १६ मे २०१७ ला ग्राम विकास विभागाने एक पत्र काढून आपसी आंतरजिल्हा बदली संदर्भात कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले. यावर राज्यातील इतर जिल्हा परिषदेने या आदेशाची अमंलबजावणी करीत आपापल्या जिल्ह्यातील शिक्षकांना कार्यमुक्त केले. तसेच नविन येणाऱ्या शिक्षकांना सामावून घेतले. परंतु गोंदिया जिल्हा परिषदेने यासंदर्भात कसलीही कार्यवाही केली नाही. यानंतर १८ मे २०१७ व ३१ मे २०१७ च्या शासन पत्रानुसार कार्यमुक्तीची कार्यवाही करण्याचे आदेश होते. परंतु त्याही पत्राला गोंदिया जिल्हा परिषदेने केराच्या टोपलीत टाकले. इतर जिल्हा परिषदांकडून आजही त्या पत्रानुसार कार्यवाही होत आहे. त्या शिक्षकांना आपसी बदलीवर जाण्याची परवानगी देणारे पत्र दिले जाते. परंतु गोंदिया जिल्हा परिषद यावर कसलीही कार्यवाही करताना दिसत नाही. यामुळे गोंदिया जिल्ह्यातून बाहेर जाणारे १३ व जिल्ह्यात येणाऱ्या १३ अश्या २६ शिक्षकांचा प्रश्न कायम आहे. १८ मे नंतर आदेश देऊ नका असे कुठलेच आदेश नाही. कोणत्याही तृट्या प्रस्तावात नसतांना जिल्हा परिषदेने पात्र शिक्षकांना आपसी जिल्हा आंतर बदलीतून डावलले आहे. आपसी आंतर बदलीचे प्रस्ताव १८ मे पर्यंत निकाली काढावे, असे शासनाचे पत्र होते. मुदत निघाल्याने मुदत वाढविण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविला. परंतु तो प्रस्ताव शासनाने अमान्य केला आहे. तृट्यांअभावी हे प्रस्ताव प्रलंबित आहेत. रविंद्र ठकारे मुख्य कार्यपालन अधिकारी जि.प. गोंदिया.
तीन वर्षांपासून १३ आपसी आंतरजिल्हा बदल्या अडल्या
By admin | Published: June 15, 2017 12:20 AM