प्रफुल्ल पटेल यांच्या चर्चेनंतर पाऊल : राजेंद्र जैन यांनी केली पाहणी : सर्व सुविधांनी युक्त असणार सेंटर गोंदिया : जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता कोविड केअर सेंटरची संख्या वाढविण्याबाबत खा. प्रफुल्ल पटेल यांनी पालकमंत्री नवाब मलिक यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये १३० खाटांचे सर्व सुविधांनी युक्त कोविड केअर सेंटर सुरु करण्याची प्रक्रिया सुरु केली होती. या कोविड केअर सेंटरची माजी आ. राजेंद्र जैन यांनी मंगळवारी भेट देऊन पाहणी केली. तसेच तेथील सोयी सुविधांचा आढावा घेतला.
येथील जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये १३० खाटांचे वातानुकुलित कोविड केअर सेंटर उभारण्याचे काम सध्या युध्दपातळीवर सुरु आहे. जिल्ह्यातील कोविड रुग्णांची गैरसोय होऊ नये, त्यांना वेळीच उपचार मिळावा, यासाठी कोविड केअर सेंटरची संख्या वाढविण्याबाबत खा. पटेल यांनी पालकमंत्री नवाब मलिक यांच्याशी चर्चा केली. माजी आ. राजेंद्र जैन यांनीसुध्दा कोविड केअर सेंटरसंदर्भात सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. यानंतर पालकमंत्र्यांनी आढावा बैठकीत जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये १३० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरु करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. आता या कोविड केअर सेंटरचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. येथे नवीन बेड, बिछाने, तसेच ऑक्सिजन पाईपलाईन टाकण्याचे कामसुध्दा युध्दपातळीवर सुरु आहे. येत्या २ मेपासून हे कोविड केअर सेंटर रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे हे कोविड केअर सेंटर पूर्णपणे वातानुकुलित असून, सर्व सुविधांनी युक्त आहे. या कोविड केअर सेंटरचे काम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप कुमार डांगे यांच्या नियंत्रणाखाली सुरु आहे. या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर सोपविण्यात आली असून, अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे हेसुध्दा यावर लक्ष ठेवून आहेत. या कोविड केअर सेंटरमुळे रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्यास मदत होणार आहे. माजी आ. राजेंद्र जैन यांनी मंगळवारी (दि. २७) सकाळी जिल्हा क्रीडा संकुलाला भेट देऊन तेथील कामाची आणि सोयी सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नानू मुदलीयार, नगरसेवक विनीत शहारे, सुनील पटले, शैलेश वासनिक उपस्थित होते. कोविड काळात रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रयत्नरत आहे.
..........
गरज पडल्यास खाटांची संख्या वाढविण्याची तयारी
जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन सभागृहात १३० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात येणार आहे. याच सेंटरलगत असलेल्या एका छोट्या हॉलमध्येसुध्दा १४ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. या खाटा कमी पडल्यास वाढविण्याची तयारीसुध्दा प्रशासनाने ठेवली आहे. खा. प्रफुल पटेल हे दाेन्ही जिल्ह्यातील कोविड परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, सातत्याने जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत.