लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात गेले दहा ते बारा दिवस झालेल्या संततधार पावसामुळे १३०६ वर घरे आणि गोठ्यांची पडझड झाली. पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन २५ जनावरे वाहून गेल्याने पशुपालकांचे नुकसान झाले. तर वीज पडून आणि पुरात वाहून गेल्याने १२ दिवसांत पाच जणांचा मृत्यू झाल्याची बाब जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीत पुढे आली आहे.
बारा दिवस संततधार झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी, प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता. एकसारखा पाऊस पडल्याने जिल्ह्यात १३०६ घरे आणि गोठ्यांची पडझड झाल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे आणि वीज पडून पाच जणांचा मृत्यू झाला. तर नदीकाठालगतच्या गावांत आलेल्या पुरामुळे २५ जनावरे वाहून गेल्याने पशुपालकांचे नुकसान झाले. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात ही बाब पुढे आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्युमुखी पडलेल्या पाच जणांपैकी ४ जणांच्या कुटुंबीयांना प्रशासनातर्फे आर्थिक मदत देण्यात आली. तर घरांची पडझड झालेल्या २०६ नुकसानग्रस्तांना शासनातर्फे त्वरित मदत देण्यात आली आहे. मंगळवारी (दि. ३०) पावसाने उसंत घेतल्याने नुकसानीचे पंचनामे करण्याच्या कामाला वेग आला आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या आकडेवारीत आणखी वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे.
रोवणी वाहून गेल्याने शेतकरी अडचणीतजिल्ह्यात संततधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाल्याने हजारो हेक्टरमधील धानपिके पाण्याखाली होती. अनेक शेतकऱ्यांचे धानाचे पन्हे आणि केलेली रोवणी वाहून गेल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगाम करावा कसा, अशी अडचण निर्माण झाली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांची फ्ह्यांसाठी आता धडपड सुरू असल्याचे चित्र आहे.
पंचनामे करण्याच्या प्रक्रियेला वेगपावसामुळे झालेल्या शेती आणि घरांच्या नुकसानीचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागाच्या यंत्रणेकडून केले जात आहेत. पाऊस थांबल्याने मंगळवारपासून नुकसानीचे पंचनामे करण्याच्या कामाला वेग आला आहे.