वर्षभरात घडले २७७ अपघात : अनेकांना मिळाले जीवनदान गोंदिया : दरवर्षी पहिल्या महिन्याच्या पंधरवड्यात रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा करुन वाहन चालकांना वाहतुकीचे नियम सांगितले जातात. तरीदेखील हलगर्जीपणे वाहन चालवून मृत्यू पावणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. सन २०१५ मध्ये २७७ अपघात घडले आहेत. यातील १२२ प्राणांतिक अपघात असून यात १३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २१७ लोक गंभीर जखमी झाले. किरकोळ जखमींची १०६ आहे. एकंदर अपघातांतून बचावलेल्यांना जीवनदानच मिळाले असे म्हणणे वावगे ठरणार नाही. वाहतूक पोलीस, सर्व पोलीस ठाणे व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे दरवर्षी रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा केला जातो. वाहन चालविणाऱ्यांनी वाहतुकीचे नियम लक्षात ठेऊन वर्षभर नियमाच्या अधिन राहून वाहन चालविणे हे अपेक्षीत असते. परंतु मद्याच्या धुंदीत किंवा हलगर्जीपणे वाहन चालवून अपघात घडल्यास बहुदा अनेकांना प्राण ही गमवावा लागतो. रस्ता सुरक्षा पंधरवड्याच्या निमित्ताने अपघात होऊ नये किंवा अपघात टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यासाठी अधिकारी व लोकप्रतिनिधी प्रयत्न करतात. परंतु पंधरवडा उलटल्यानंतर वाहन चालकही वाहतुकीच्या नियमांकडे लक्ष घालत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत.सन २०१५ मध्ये जानेवारी महिन्यात ११ अपघातांत १२ जणांचा मृत्यू झाला असून त्यात नऊ पुरुष तीन महिला आहेत. फेबु्रवारी महिन्यात सहा अपघातांत सात पुरुषांचा मृत्यू झाला आहे. मार्च महिन्यात नऊ अपघातांत नऊ पुरुषांचा मृत्यू झाला आहे. एप्रिल मध्ये १८ अपघातात १९ जणांना मृत्यू झाला असून १८ पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. मे महिन्यात १३ अपघातांत १४ लोकांचा मृत्यू झाला असून १३ पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. जून महिन्यात नऊ अपघातांत ११ पुरुषांचा मृत्यू झाला आहे. जुलै महिन्यात सहा अपघातांत सात पुरुषांचा मृत्यू झाला आहे. आॅगस्ट महिन्यात सहा अपघातांत सात जणांचा मृत्यू झाला असून पाच पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. सप्टेंबर महिन्यात सहा अपघातांत सात पुरुषांचा मृत्यू झाला आहे. आॅक्टोबर महिन्यात ११ अपघातांत १२ जणांचा मृत्यू झाला असून १० पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. नोव्हेंबर महिन्यात १५ अपघातांत १५ जणांचा मृत्यू झाला असून १३ पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. तर डिसेंबर महिन्यात १२ अपघातांत १२ जणांचा मृत्यू झाला असून आठ पुरुष व चार महिलांचा समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)
१३२ जणांचा अपघाती मृत्यू
By admin | Published: January 11, 2016 1:43 AM