लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : अवैधरीत्या दारू काढून तिची विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी आपली कंबर कसली असून, सातत्याने धाडसत्र राबविले जात आहे. अशातच पोलिसांनी मंगळवारी (दि. ९ मार्च) दुपारी २ ते रात्री ८ वाजताच्या दरम्यान ७ दारूविक्रेत्यांवर धाड घालून त्यांच्याकडील एक लाख ३५ हजार ३५० रुपयांचा माल जप्त केला. महाशिवरात्रीचा उत्सव शांततेत पार पडावा याकरिता राबविण्यात आलेल्या धाडसत्रात छाया सोविंदा बरेकर (रा. सिली) हिच्या घरातून २७ प्लास्टिक चुंगडीत ५४० किलो सडवा, १० लीटर मोहा दारू व दारू काढण्याचे साहित्य असा एकूण ४५ हजार ४५० रुपयांचा माल, संजय सोविंदा बरेकर (रा. सिली) याच्या घरातून ५८० किलो सडवा, १० लीटर मोहा दारू व दारू काढण्याचे साहित्य असा एकूण ४८ हजार ६५० रुपयांचा माल, शांता बाबूराव बरीयेकर (रा. रविदास वॉर्ड) हिच्या घरातून झडतीत २० प्लास्टिक चुंगडीत २०० किलो सडवा असा १६ हजार रुपयांचा माल, पूर्णा प्रल्हाद तांडेकर (रा. रविदास वॉर्ड) हिच्या घरातून १० प्लास्टिक चुंगडीत २०० किलो सडवा, १० लिटर मोहा दारू व दारू काढण्याचे साहित्य असा एकूण १८ हजार २५० रूपयांचा माल, शेवंता अनिल उके (रा. ठाणेगाव) हिच्या घरातून १५ लीटर मोहा दारू असा एक हजार ५०० रुपयांचा माल, नाशिया वासनिक (रा. कोडेलोहारा) हिच्या घरातून २० लीटर मोहा दारू असा एकूण चार हजार रुपयांचा माल तर धर्मराज उरकूडा भोयर (रा. नवेगाव खुर्द) याच्या घरातून १५ लीटर मोहा दारू असा एक हजार ५०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. अशा प्रकारे ७ ठिकाणी घातलेल्या धाडीत एकूण एक लाख ३५ हजार ३५० रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कार्यवाही उप विभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश पारधी, सपोनि ईश्वर हनवते, महिला उपनिरीक्षक राधा लाटे, हवालदार साठवणे, दामले, शिपाई श्रीरामे, बर्वे, बांते, भांडारकर, उके, दमाहे, शेख यांनी केली.