गोंदिया : बंदी असताना अवैधरीत्या दुकानात साठवून ठेवलेला १३६.७०२ किलो सुगंधित तंबाखूचा साठा अन्न व औषध प्रशासनाने धाड घालून जप्त केला. देवरी येथील दुर्गा चौक बाजार लाइनमधील विशाल किराणा दुकान येथे मंगळवारी (दि.२३) दुपारी २:४० वाजता दरम्यान ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या तंबाखू साठ्याची किंमत एक लाख २७ हजार ६७५ रुपये आहे.
फिर्यादी अन्न सुरक्षा अधिकारी महेश प्रभाकर चहांदे (४३) यांनी देवरी येथील बाजार लाइनमधील रहिवासी विशाल महावीर शाहू (३५) याच्या विशाल किराणा दुकानावर धाड घातली. या धाडीत अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाला शासनाने बंदी लावलेल्या सुगंधित तंबाखूचा १३६.७०२ किलो वजनाचा साठा मिळून आला. या सुगंधित तंबाखूची किंमत एक लाख २७ हजार ६७५ रुपये आहे. पथकाने हा तंबाखू साठा जप्त केला आहे. तसेच, फिर्यादी अन्न सुरक्षा अधिकारी महेश चहांदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विशाल शाह याच्यावर भादंवि कलम १८८,२७२,२७३,३२८ सहकलम २६(२)(आय),२६(२),(आयवी),२७(३)(ई),३(१),२२,(वी), अन्न सुरक्षा मानके अधिनियम २००२ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक डांगे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक गंगाकाचूर करीत आहेत.
हा माल केला जप्त
पथकाने या कारवाईत १९० पाकिटे केसरयुक्त विमल मसाला किंमत २२ हजार ८०० रुपये, ११० पाकिटे पान पराग पान मसाला किंमत १२ हजार रुपये, १५ डबे सुगंधित तंबाखू रत्ना टोबॅको ब्रॅंड किंमत पाच हजार २५० रुपये, १५० पाकिटे सुगंधित तंबाखू वी-१ किंमत चार हजार ५०० रुपये, ३६ पाकिटे राजश्री पान मसाला किंमत चार हजार ३२० रुपये, ४० पाकिटे सुगंधित तंबाखू के.पी. ब्लॅक लेबल तंबाखू किंमत एक हजार २०० रुपये, ७० पाकिटे सुगंधित तंबाखू के.पी. ब्लॅक लेबल किंमत एक हजार ५७५ रुपये, २० पाकिटे होला सुगंधित तंबाखू किंमत तीन हजार २८० रुपये, ९५ पाकिटे आर.के. सुपर प्रीमियम क्वालिटी हुक्का सुगंधित तंबाखू किंमत १४ हजार २५० रुपये, ३९० पाकिटे एम.डी.-७ सुपर प्रीमियम क्वालिटी हुक्का सुगंधित तंबाखू किंमत ५८ हजार ५०० रुपये असा एकूण एक लाख २७ हजार ६७५ रुपयांचा माल जप्त केला आहे.