लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी गोंदिया आणि तिरोडा मतदारसंघातून एकूण ३६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यापैकी तब्बल १४ मजुरांनी आपला व्यवसाय हा शेती व मजुरी असल्याचे निवडणूक विभागाकडे सादर केलेल्या शपथपत्रात म्हटले आहे. एकीकडे निवडणूक लढविणे आता सोपे राहिले नाही असे म्हटले जात असतानाच शेती आणि मजुरी करणाऱ्या १४ उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली असल्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघासाठी निवडणुका होत आहेत. यामध्ये दोन विद्यमान आमदारांच्या वर्चस्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोघांच्या विरोधात दमदार उमेदवार असून गोंदियात माजी आमदार तर तिरोडात माजी आमदारांचे पुत्र लढाईत आहेत. हे चारही उमेदवार कोट्यधीश आहे. ते आपले राजकीय कसब वापरुन निवडणूक लढवित आहेत. यात शंकाच नाही; मात्र निवडणुकीत लोकांचा विश्वास महत्त्वाचा आहे या जोरावर एक-दोन नव्हे तर तब्बल १४ मजूर रिंगणात उतरले आहेत.
यामध्ये गोंदिया विधानसभा मतदारसंघातून एक तर तिरोडा विधानसभा मतदारसंघातून १३ मजूर रिंगणात आहेत. यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती मिळाली आहे.
हे आहेत रिंगणातील उमेदवार आपला व्यवसाय शेती व मजुरी दाखवून रिंगणात उतरलेल्या उमे- दवारांमध्ये गोंदिया विधानसभा मतदारसंघातील राजेश हनवतलाल डोये यांचा तर तिरोडा विधानसभा मतदारसंघातून चंपालाल दशरथ साठवणे, दिनेश दुधराम टेकाम, राजेंद्र दिलीप सोयम, राजेश माधोराव आंबेडारे, अजय विश्वनाथ अंजनकर, खुशाल देवाजी कोसरकर, कैलाश बुधराम गजभिये, राजेश मयाराम तायवाडे, गणपत डुलीचंद रहांगडाले, निरज भूमेश्वर मिश्रा, निलेश प्रदीप रोडगे, राजेंद्र दामोदर बोंदरे व सोनू रमेश टेंभेकर यांचा समावेश आहे.