लोहारा : मारबतच्या पार्श्वभूमीवर जुगाराला उधाण येत असून, यावर नजर ठेवून असलेल्या देवरी पोलिसांनी धाडसत्र राबवून १५ जुगाऱ्यांना जुगार खेळताना रंगेहात पकडले आहे. सोमवारी (दि.६) पोलिसांनी केलेल्या या कारवायांत १९ हजार ९५० रुपयांचा माल जप्त केला आहे.
ठाणेदार रेवचंद सिंगनजुडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने मौजा परसटोला येथे आफताब डेकोरेशनसमोरील चौकात धाड घातली असता, तेथे गजानन इतवारी सार्वे (२२), अमोल अनिल बडोले (२५, रा.परसटोला), नितेश केशव कोहळे (३२, रा.वाॅर्ड क्रमांक- ५, देवरी) हे मिळून आले, तर बबलू मेश्राम, अनिल नेताम, विजय मेश्राम, अनिल सिरसाम, आशू ठाकरे, तेजू मेश्राम, रोहित भोयर, जापान मडावी (सर्व रा.परसटोला) पळून गेले. पोलिसांनी फळावरील ५२ तासपत्ते, रोख १,५५० रुपये, आरोपींच्या झडतीत रोख ९०० रुपये, पाच हजार रुपये किमतीचा एक मोबाइल असा एकूण ७,४५० रुपयांचा जप्त केला. तावर यांच्या तक्रारीवरून कलम १२ (अ) मजुका अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
तर दुसऱ्या कारवाईत मस्कऱ्या चौकात पथकाने धाड घातली असता, विनोद दिलीप सरोजकर (३७, मस्कऱ्या चौक, देवरी), हितेश धनराज सोनवाने (२८, रा.वाॅर्ड क्रमांक-१२, देवरी) व महेश मनोहर नागदेवे (३०, रा.वाॅर्ड क्रमांक-१२, देवरी) हे जुगार खेळताना रंगेहात मिळून आले. पोलिसांनी त्यांना अटक केली. फळावरून रोख ६०० रुपये, ५२ तासपत्ते, आरोपीतांच्या अंगझडतीत २,२०० रुपये रोख, ९,७०० रुपये किमतीचे तीन मोबाइल असा एकूण १२,५०० रुपयांचा माल जप्त केला. फिर्यादी पोलीस नायक हेमंत मस्के व हवालदार झिंगू मडावी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही कारवायांत कलम १२ (अ) मजुका अन्वये गुन्हा नोंद केला आहे.