लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सन २०१९-२० या शैक्षणिक सत्रात वर्ग एक ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यासाठी सहा लाख ९१ हजार २६४ पुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एक लाख ४० हजार विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके मिळतील अशी सोय समग्र शिक्षा अभियानंतर्गत करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक भांडार वितरण केंद्र नागपूर येथून ही पुस्तके प्रत्येक तालुक्याला वितरीत करण्यात येत आहे.गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी दोन तालुक्यात पुस्तके आली आहेत. पाठ्य पुस्तके सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी शाळा व केंद्रांवर सोपविण्यात आली आहे. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस रोडावत आहे. सन २०१९-२० या शैक्षणिक सत्रासाठी पाठ्यपुस्तके मागण्यात आली. परंतु यु डायस प्लसनुसार विद्यार्थी संख्या निश्चित नसल्यामुळे सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेवून पाठ्य पुस्तके मागविण्यात आली आहे.यंदा मागील वर्षीच्या तुलनेत पाच हजारांच्या घरात विद्यार्थी कमी असतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ज्या तालुक्यांना अधिकच्या पुस्तका आल्या तर त्यांनी अधिकची पुस्तके समग्र शिक्षा अभियान गोंदिया यांच्याकडे पाठविण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. शाळा सुरु होण्याच्या आठ दिवस अगोदर पुस्तके शाळेत पोहोचतील यासाठी नियोजन करण्याच्या सुचना शिक्षण विभागाने दिल्या आहे. पाठ्य पुस्तकांपासून विद्यार्थी वंचित राहिल्यास ही जबाबदारी गटशिक्षणाधिकारी यांची असेल अशीही ताकीद देण्यात आली आहे.पुस्तक वाहतुकीसाठी एक लाख ७४ हजारगोंदिया जिल्ह्यातील एक लाख ४१ हजार विद्यार्थ्यांसाठी सहा लाख ९१ हजार पुस्तकांची मागणी करण्यात आली आहे. त्या पुस्तकांचे वजन एक लाख ४५ हजार ६२६ किलो ग्रॅम आहे. नागपूरवरुन गोंदिया जिल्ह्यात आणण्यासाठी या पुस्तकांच्या वाहतुकीवर एक लाख ७४ हजार ७५१ रुपये खर्च करण्यात येणार आहे.