गोंदिया : जंगलात लागलेली आग वणव्याचे रूप धारण करते. त्यात मूल्यवान वनसंपदा नष्ट होते. तर वन्यप्राणी व पक्ष्यांनाही धोका उत्पन्न होतो. वन विभागासाठी ही बाब चिंतेची असल्याने वणव्यावर नियंत्रिण मिळविण्यासाठी आता फायर ब्लोअर नामक मशिन्सचा उपयोग केला जाणार आहे. त्यासाठी वन विभागाकडून १५० फायर ब्लोअर मशिन्सची खरेदी करण्यात आल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.गोंदिया वनविभाग गोंदिया अंतर्गत एकूण २७४ बिट येतात. या प्रत्येक बिटमध्ये एकेक फायर ब्लोअर मशिन देण्यात येत आहे. जुन्या १५ मशिन्स वनविभागाकडे उपलब्ध आहेत. या मशिन्स कमी पडत असल्याने वन विभागाने आता नव्याने १५० फायर ब्लोअर मशिन्स खरेदी केल्या आहेत. त्यामुळे आता एकूण १६५ मशिन्सच्या सहाय्याने आग नियंत्रित केली जात आहे. एका मशिनची किंमत ४५ हजार रूपये एवढी असून १५० मशिन्सच्या खरेदीसाठी तब्बल ६७ लाख ५० हजार रूपयांचा खर्च करण्यात आलेला असून सदर मशिन्स वाटपसुद्धा करण्यात आल्या आहेत.जिल्ह्यात वनविभागाचे २७४ बिट असल्यामुळे सर्वच बिटमध्ये या मशिन्स उपलब्ध झालेल्या नाहीत. मात्र एखाद्या बिटमध्ये आग लागली तर जवळपासच्या इतर बिटमधील मशिन्स बोलावून आग नियंत्रित केली जाते. तसेच प्रत्येक राऊंडमध्ये दोन-तीन मशिन्स असतातच. त्यामुळे फारसे जळीत क्षेत्र नसते, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. वनात आग लागण्याबाबत दोन मुद्दे विचारात घेतले जातात. एक म्हणजे किती ठिकाणी आग लागली व दुसरा म्हणजे आगीमुळे किती क्षेत्र जळले. मात्र या यंत्रांमुळे आग त्वरित कंट्रोल करण्यात येत असल्याने अधिक क्षेत्र जळत नाही. १ ते १० एप्रिल दरम्यान आग लागल्याचे एक पॉर्इंट आहे. त्यापूर्वीसुद्धा आग लागल्याचे काही पॉर्इंट आहेत. होळीच्या जवळपास वनात आग लागल्याच्या घटना कळल्या होत्या. शिवाय सॅटेलाईट सर्वेक्षणातून चार ते पाच ठिकाणी आग लागल्याचे समजले होते. मात्र आगीवर वेळीच नियंत्रण मिळविण्यात आल्याने जळीत क्षेत्र अधिक नसल्याचे वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)वनांवर आश्रित लोकांवर संकटजिल्हाभरातील अनेक वनांत मोठ्या प्रमाणात मूल्यवान वनसंपत्ती आहे. जळावू लाकडांसह इमारती लाकूड तसेच बहुपयोगी लाकडे याच वनांतून मिळतात. विविध औषधीयुक्त वृक्षसंपदा, औषधीय गुणांनी भरपूर अशी पाने, फळे, फुले व मुळे उपलब्ध करून देणारी झाडे या वनांमध्ये आहेत. जंगल परिसरात किंवा जंगलालगत राहणारी कुटुंबे, आदिवासी वसत्यांचे जीवन याच नैसर्गिक वनसंपत्तीवर अवलंबून असते. मात्र एखाद्यावेळी वणवा लागला आणि वनकर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केला की त्यात लाखमोलाची ही वनसंपत्ती जळून खाक होते. वन्यजीव व पक्ष्यांचेही जीवन धोक्यात येते. अशावेळी वनसंपत्तीच्या नुकसानासह त्यावर अवलंबून असलेली कुटुंबेसुद्धा अनाश्रित होतात. फायर ब्लोअर मशिन्सचा उपयोगफायर ब्लोअर मशिन सुरू केल्यानंतर तिला लागलेल्या पाईपच्या माध्यमाने वेगाने हवा बाहेर फेकली जाते. त्याद्वारे तीन मीटरपर्यंतचा पालापाचोळा हटवून जागा स्वच्छ केली जाते. जमिनीवर पालापाचोळा दूर झाल्यास आग पसरत नाही व ती नियंत्रित होवून मर्यादित राहते. नंतर तिला विझविले जाते. या प्रकारामुळे आगीचे जळीत क्षेत्र अधिक राहत नाही.
वणवा नियंत्रणासाठी १५० फायर ब्लोअर मशिन्स
By admin | Published: April 12, 2016 4:15 AM