अवघ्या देशात कोरोनाला लसीकरणाला जानेवारी महिन्यात सुरुवात झाली. यात आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्कर्सला प्राधान्य देत त्यांचे लसीकरण सुरू करण्यात आले होते. मात्र यात बराच वेळ गेला असता व आता कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढत असल्याने शासनाने १ मार्चपासून ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. अधिक वेगाने लसीकरण करता यावे यासाठी यंदा शासनाने महत्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत नोंदणी असलेल्या खाजगी हॉस्पिटल्समध्येही लसीकरणासाठी सुविधा उपलब्ध करवून दिली आहे. जेणेकरून संबंधित व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरिकांना शासकीय रूग्णालयात न जाता त्यांच्या जवळपास खासगी हॉस्पिटलमध्ये लस घेता येईल.
यासाठी शहरातील गोंदिया केअर हॉस्पिटल, न्यू गोंदिया सिटी हॉस्पिटल, श्री राधेकृष्ण हॉस्पिटल, बालाजी नर्सिंग होम व ब्राम्हणकर हॉस्पिटलमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. यासह अवघ्या जिल्ह्यातच शासकीय रूग्णालयांमध्ये लसीकरण सुरू असून नागरिक तेथेही नि:शुल्क लस घेत आहेत. मात्र विशेष म्हणजे बाब म्हणजे, खाजगी हॉस्पिटल्समध्ये २५० रुपये प्रती लस असे दर आकारले जात असतानाही आता नागरिक स्वत: जाऊन लस घेत असल्याचे दिसत आहे. हेच कारण आहे की, आतापर्यंत १५०० नागरिकांनी या खाजगी रूग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली आहे.
------------------------
बालाजी नर्सिंग होममध्ये सर्वाधिक लसीकरण
शहरातील पाच खाजगी हॉस्पिटल्समध्ये लसीकरण केले जात असून आतापर्यंत १५०० नागरिकांनी येथे लस घेतली आहे. मात्र यातील बालाजी नर्सिंग होममध्ये सर्वाधिक ४१० नागरिकांनी लस घेतली आहे. तर गोंदिया केअर हॉस्पिटलमध्ये ३८५, न्यू गोंदिया सिटी हॉस्पिटलमध्ये १८७, श्री राधे कृष्ण हॉस्पिटलमध्ये २७९ व ब्राम्हणकर हॉस्पिटलमध्ये २३९ नागरिकांनी लस घेतली आहे.