गोंदिया : लसींचा नियमित पुरवठा होत नसल्याने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात वांरवार अडथळा निर्माण होत होता. तर यामुळे पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोसची वेळ येऊनही अनेकांना डोस मिळाला नव्हता. त्यामुळेच शासनाने १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण बंद करुन दुसऱ्या डोसला प्राधान्य दिले आहे. विशेष म्हणजे कोरोना विरुध्दच्या लढ्यात सर्वात अग्रेसर असलेले डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स सुध्दा असे १४ हजार २०० कोरोना योध्दे कोरोनाच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत होते. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ८३ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यात ४५ ते ६० वयोगटातील ६७४९८ नागरिकांचे लसीकरण झाले असून ते लसीकरणात सर्वात पुढे असल्याचे चित्र आहे. तर १८ ते ४४ वयोगटातील ४४१६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. बुधवारी जिल्ह्याला कोव्हॅक्सिनचे १७०० आणि काेविशिल्डचे १८५०० डोस प्राप्त झाले. त्यामुळे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला सर्व १४० केंद्रावरुन सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे लसीकरणाला गती प्राप्त होण्याची शक्यता आहे.
.................
जिल्ह्यातील ९०० कोरोना योध्दयांनी अद्याप एक डोस घेतला नाही
- मागील वर्षीपासून डॉक्टर आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स कोरोनाविरुध्द लढा देत आहे. यापैकी ९०० कोरोना योध्दयांनी अद्याप लसीचा एकही डोस घेतला नसल्याची बाब पुढे आली आहे.
- आतापर्यंत २८ हजार कोरोना योध्दयांनी कोरोनाचा पहिला आणि दुसरा डोस घेतला आहे तर १४२०० कोरोना योध्दे दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत.
- लसीकरणा दरम्यान कोरोना योध्दयांना प्राधान्य दिले जात आहे.
..............
आतापर्यंत झालेले एकूण लसीकरण : १ लाख ८३ हजार
आरोग कर्मचारी : पहिला डोस ९७५८, दुसरा डोस ५५५९
फ्रंट लाईन वकर्स : पहिला डोस १९८५४, दुसरा डोस ९६८३
१८ ते ४४ वयोगट : पहिला डोस ४४१६
४५ ते ६० वयोगट : पहिला डोस : ५७३११, दुसरा डोस १०१८७
६० वर्षावरील : पहिला डोस ५४८८२, दुसरा डोस ११०९९